कोलवाळ तुरुंगातील कनेक्टीव्हीटी गुल, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 03:03 PM2019-01-18T15:03:56+5:302019-01-18T15:12:44+5:30
गोव्यातील मध्यवर्ती तुरुंग असलेला कोलवाळ सेंट्रल जेल सध्या मागचे सहा महिने बाकीच्या प्रशासनाशी डिस्कनेक्ट आहे. या जेलला इंटरनेटचे कनेक्शन नसल्याने व्हिडिओ कॉन्फरसिंगसारखी महत्वाची सुविधाही बंद पडली आहे.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव : गोव्यातील मध्यवर्ती तुरुंग असलेला कोलवाळ सेंट्रल जेल सध्या मागचे सहा महिने बाकीच्या प्रशासनाशी डिस्कनेक्ट आहे. या जेलला इंटरनेटचे कनेक्शन नसल्याने व्हिडिओ कॉन्फरसिंगसारखी महत्वाची सुविधाही बंद पडली आहे. तुरुंगातील कैद्यांचे न्यायालयात येण्याचे त्रास वाचावेत यासाठी या सर्व कैद्यांच्या सुनावण्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात याव्यात अशा मार्गदर्शक सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या असल्या तरी गोव्याच्या कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगातील ही कॉन्फरन्सिंग सुविधा मागचे सहा महिने बंद असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाला सध्यातरी वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या आहेत.
तुरुंग महानिरिक्षक राजेंद्र मिरजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तुरुंगातील इंटरनेट कनेक्टिव्हीटी मागचे सहा महिने बंद असून त्यामुळेच या तुरुंगातून ही सुविधा देणे अशक्य आहे. सध्या या तुरुंगात एकूण 458 बंदी असून त्यापैकी 197 सुनावण्या दक्षिण गोव्यातील न्यायालयात चालू आहेत.
तुरुंग प्रशासनाचा वाहतुकीवरील खर्च कमी व्हावा तसेच कैद्यांचे न्यायालयातील हेलपाटे कमी व्हावेत या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. सध्या आगशी ते कुठठाळी या मार्गावर चालू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी वाढत असल्याने कोलवाळ येथील कैद्यांना मडगावात आणण्यापेक्षा त्यांची तुरुंगातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा सुनावणी घ्यावी अशी सूचना दक्षिण गोवा न्यायालयातून तुरुंग प्रशासनाला करण्यात आली आहे. मात्र ही सुविधाच उपलब्ध नसल्याने अशा सुनावण्या घेणे शक्य नसल्याचे तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
कोलवाळ तुरुंगाच्या बाहेर रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून हे काम करताना या तुरुंगाला इंटरनेट कनेक्टीव्हीटी देणारे फायबर केबल कापले गेले होते त्यामुळेच ही कनेक्टीव्हीटी तुटली आहे. जोपर्यंत हे रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत केबल पुन्हा जोडणे अशक्य असल्याचे कंत्राटदाराकडून कळवण्यात आले आहे. या कामाची गती पहाता पुढचे वर्षभर तरी ही कनेक्टीव्हीटी मिळणे अशक्य असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात मिरजकर यांना विचारले असता, तुरुंगातील फायबर केबल जोडून दयावेत यासाठी गेल इंडिया या कंपनीला आम्ही यापूर्वीच विनंती केली आहे. मात्र रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यत केबल जोडणे अशक्य असल्याचे कळवण्यात आल्यामुळे आमचाही नाईलाज झाला आहे असे त्यांनी सांगितले.