श्री देव बोडगेश्वराच्या जत्रोत्सवाला आरंभ; म्हापसा येथे सोहळ्याला आजपासून झाली सुरुवात
By काशिराम म्हांबरे | Published: January 24, 2024 03:09 PM2024-01-24T15:09:26+5:302024-01-24T15:09:37+5:30
देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली माहिती
म्हापसा, काशिराम म्हांबरे: म्हापसा येथील राखणदार गोव्याबरोबर शेजारील राज्यातल्या सर्व जाती- धर्मातील भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान असलेल्या सुप्रसिद्ध श्री देव बोडगेश्वरचा ८९ वा महान जत्रोत्सव सोहळा आजपासून आरंभ झाला. जत्रेनिमीत्त सकाळपासून भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. पुढील १३ दिवस चालणाऱ्या या उत्सवात आज जत्रेनिमित्त विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी आरती, तीर्थप्रसाद तसेच महाप्रसादही संपन्न झाला. जत्रेनिमित्त दर दिवशी विविध धार्मिक विधी तसेच श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन केले जाते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात अशी माहिती देवस्थानचेअध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली.
देवाच्या दर्शनासाठी दर दिवशी भाविकांकडून सकाळपासून गर्दी केली जाते. सकाळी सुरु होणारी गर्दी रात्री उशीरार्पंत सुरुच असते. अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी येतात. त्यामुळे नवसाला पावणारा देव म्हणूनही बोडगेश्वराला मानले जाते. जत्रेच्या पार्श्वभूमीवर सुमारे १ हजाराहून जास्त विविध स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. उत्सवात लाखो भाविक दरवर्षी दर्शन घेत असतात. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे तसेच इतर अनेक मान्यवरांनी देवाचे दर्शन घेतले.