भक्तीमय वातावरणात श्री लईराई देवीच्या व्रतास आरंभ
By काशिराम म्हांबरे | Published: April 22, 2023 01:54 PM2023-04-22T13:54:10+5:302023-04-22T13:54:24+5:30
बरेच भक्तगण गुढी पाढव्या पासून शाहाकारी पाळून व्रत पाळण्यास आरंभ करतात. जत्रा ५ दिवसावर आल्यावर धोंड्यांच्या कडक व्रतास आरंभ होतो.
म्हापसा : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त धोंड भक्तगणांच्या कडक, पवित्र व्रतास भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.सोमवार २४ रोजी होणाऱ्या या जत्रेसाठी लहान मुलापासून ते ९० वर्षापर्यंतचे वृद्ध धोंड भक्तगण देवीचे व्रत पाळतात. त्यात महिला धोंडाचाही समावेश असतो. बरेच भक्तगण गुढी पाढव्या पासून शाहाकारी पाळून व्रत पाळण्यास आरंभ करतात. जत्रा ५ दिवसावर आल्यावर धोंड्यांच्या कडक व्रतास आरंभ होतो.
काही जेष्ठ धोंड ३ दिवसांच्याही कडक व्रताचेपालन करतात. पूर्ण गोवाभर विखुरलेल्या या धोंडांच्या व्रतामुळे गावांगावातून मंगलमय तसेच भक्तीमय वातावरण तयार होत असते. मंदिर किंवा नैसर्गिक तलाव किंवा एखाद्या स्वच्छ किंवा पवित्र अशा ठिकाणी एकत्रित येऊन व्रता निमीत्त तयार केलेल्या 'माटवात ' राहून हे व्रत पाळले जातात. व्रताच्या काळात स्नान करून देवी मातेच्या जयजयकाराने आहार करतात.
आहारासाठी बनवले जाणारे खाद्य तेवढेच सोवळे, पावित्र्य पाळून सर्वजण मिळून मिसळून एकत्रितपणेआहार बनवला जातो. परिसरातील लोकही श्रद्धेपायी धोंडांच्या जत्रेच्या आदल्या दिवशी ' व्हडले'जेवणाच्या कार्यक्रम सहभागी होण्यासाठी माटवात येत असतात. त्यांच्याकडूनही पावित्र्य कायम राहणार याची काळजी घेतली जाते. पावित्र्य राखण्यावर भर दिला जातो. यंदा रविवार २३ रोजी हा जेवणाचा कार्यक्रम आहे.
बार्देश तालुक्यातील हळदोणा इथल्या 'भाटातील ' माटवातले ८० वर्षाचे धोंड पांडुरंग बागकर गेल्या ६० वर्षाहून अधिक काळापासून देवीचेव्रत पाळतात. जत्रा पूर्वीच्या ५ दिवसापासून ते व्रत पाळण्यास आरंभ करतात. व्रताच्या काळात नामस्मरण, जप, आरत्या, भजने अशा विविध धार्मिक कार्यक्रमातून मन रमून जात असल्याची माहिती बागकर यांनी दिली.
नितेश गडेकर यांनी आपण २८ वर्षा पासून हे व्रत पाळत असल्याचे सांगून जत्रेच्या भक्तीमय वातावरणात दिवस कसे निघून जातात हे कळत नसल्याचे सांगितले. देवीवरची श्रद्धा आणि भक्ती यामुळे वातावरण अत्यंत मंगलमय असते. कसल्याच प्रकारचे विघ्न नसताना हे व्रत पाळले जातात असेही गडेकर म्हणाले. काही धोंड पूर्वापार आलेल्या परंपरेनुसार हे व्रत पाळतात. जत्रेच्या दिवशी हे धोंड देवीच्या तळीवर जाऊन स्नान करतात. त्यानंतर देवीच्या दर्शन घेतल्यावर अग्नी प्रवेश करून आपल्या व्रताची सांगता करतात.