४१० गावांमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 10:36 AM2023-04-25T10:36:58+5:302023-04-25T10:38:58+5:30
साळगाव पंचायत सभागृहातून राज्यातील पंचायती व पालिकांशी लाईव्ह संवादावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः राज्यातील ४१० महसुली गावांमध्ये कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू केले जातील. या केंद्रावर सर्व प्रकारचे दाखले व सरकारी सेवा माफक शुल्कात मिळेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
साळगाव पंचायत सभागृहातून राज्यातील पंचायती व पालिकांशी लाईव्ह संवादावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारच्या १२१ सेवा सध्या ऑनलाइन आहेत. लोकांनी या ई सेवेचाही लाभ घ्यावा. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमातून आम्ही तळागाळात पोहोचलो. गावागावांत 3000 पेक्षा अधिक मोठे कार्यक्रम केले. प्रशासन तुमच्या दारी, मंत्री तुमच्या दारी, आदी उपक्रमांद्वारे लोकांच्या दारी गेलो. लोकांना सरकारी सेवा अडचणीविना सुटसटीतपणे मिळायला हव्यात, हे सरकारचे धोरण आहे.
स्वयंपूर्ण गोवा २.० अंतर्गत आयटीआय, हस्तकला, पॉलिटेक्निक, आदी माध्यमातून क्षेत्रातील युवक, महिलांना कौशल्य प्रशिक्षण व एकूणच कौशल्य विकास यावर भर दिला. सरकार योजना ठरवते, परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आहे. अंत्योदय तत्त्वावर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून 'गोवा की बात' या उपक्रमातून लोकांपर्यंत योजना नेल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमदार केदार नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना वाढदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी आपल्या शुभेच्छा संदेशात सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा प्रगतीची उंच शिखरे गाठत आहे. कठोर परिश्रम घेणाऱ्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांना मी दीर्घ व सुदृढ आयुष्य चितितो." तर शाह यांनी तर शुभेच्छापर संदेशात असे म्हटले आहे की, 'सावंत यांची लोककल्याणाप्रति असलेली आवड आणि वचनबद्धता खरोखरच उल्लेखनीय आहे. आज त्यांच्या वाढदिनी मी त्यांना दीर्घ व सुदृढ आरोग्य चिंतितो.'
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"