केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा; भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदी यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 12:40 PM2024-07-29T12:40:41+5:302024-07-29T12:41:05+5:30
मुख्यमंत्री सावंत हे गेले दोन दिवस दिल्लीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्राच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले. प्रमोद सावंत हे या बैठकीत सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच भाजपशासीत राज्यांचे १३ मुख्यमंत्री, १५ व उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
मोदी म्हणाले की, 'लोककल्याणासाठी केंद्र व राज्य सरकारनी समन्वयाने प्रयत्न केल्यास विकसित भारताचे स्वप्न निश्चितच आम्ही पूर्ण करू शकतो. लोकांपर्यंत योजना पोहचवण्यासाठी सोशल मीडियासह अन्य व्यासपीठांचा उपयोग करा, असे मोदींनी सुचवले. भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर पोचली पाहिजे, तसेच विकासकामांवर भर दिला पाहिजे,' असे ते म्हणाले.
नड्डा म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांच्या बैठका घेतल्याने तीन फायदे होतात. एक म्हणजे मोदी यांचे अनुभवी मार्गदर्शन सर्वांना मिळते. मुख्यमंत्री आपले म्हणणे मांडतात. त्यामुळे अनुभवांची देवाण-घेवाण होते व नवीन माहिती मिळते. तसेच आणखी काहीतरी नवीन करण्याची भावना बळावते.'
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत राज्यांनी कसे पुढे जावे याबद्दल मार्गदर्शन केले.
राज्याच्या विकासासाठी मोदींचे मार्गदर्शन : सावंत
दरम्यान, मुख्यमंत्री सावंत हे गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. शनिवारी त्यांनी नीती आयोगाच्या बैठकीत सावंत यांनी राज्याच्या चौफेर विकासाबद्दल माहिती दिली होती. पायाभूत सुविधा, पर्यटन व आरोग्य क्षेत्रात राज्याचा सातत्याने विकास होत आहे, याबद्दल सांगितले होते. बैठकीनंतर सावंत यांनी पत्रकारांना असे सांगितले की, 'जनतेच्या सेवेसाठी मोदींनी बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले तसेच राज्याच्या सर्वागिण विकासासाठी कसे पुढे जावे हे सांगितले.'