पाकच्या तुलनेत भारत अल्पसंख्याकांसाठी अधिक सुरक्षित, भारतीय असल्याचा आनंद अन् अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 11:20 AM2024-08-30T11:20:42+5:302024-08-30T11:22:59+5:30
लोकमत प्रतिनिधीने परेरा यांच्या कासावली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली असता, त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि आठवणी उलगडताना त्यांना आनंद झाला.
धीरज हरमलकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गोवा मुक्तीपूर्वी पाकिस्तानात गेलेल्या, गोव्यात जन्मलेल्या जोसेफ फ्रान्सिस परेरा यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते 'भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. अल्पसंख्याक समुदायांना राहण्यासाठी भारत हे पाकिस्तानच्या तुलनेत सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे, असे परेरा म्हणाले.
गोव्याच्या स्वातंत्र्यापूर्वी शिक्षण आणि नोकरीसाठी पाकिस्तानात गेलेले नीज गोंयकार जोसेफ फ्रान्सिस परेरा हे आता गोव्यात परतले असून गेल्या ११ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर बुधवारी परेरा यांना आता कुठे भारतीय नागरिकत्व मिळाले. लोकमत प्रतिनिधीने परेरा यांच्या कासावली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली असता, त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि आठवणी उलगडताना त्यांना आनंद झाला.
परेरा म्हणाले, त्यांचा जन्म गोव्यात झाला असून सुरुवातीचे शालेय शिक्षण कासावलीच्या तेव्हाच्या पोर्तुगीज शाळेतून गोव्यात पोर्तुगीज राजवटीत झाले. १९५९ मध्ये त्यांचे मामा आपल्या बहिणीला भेटायला गोव्यात आले. त्यानंतर त्यांनी जोसेफची चौकशी केली आणि त्याला उच्च शिक्षणासाठी कराची, पाकिस्तानला नेण्यात रस दाखवला.
१९६० मध्ये जोसेफ गोवा सोडून कराची पाकिस्तानला गेले आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मॅट्रिक पूर्ण केले. त्यांचे मामा कराचीत अॅफेक्स फर्नाडिस हे संगीत शिक्षक होते आणि उच्च पदाधिकाऱ्यांच्या मुलांना सेलो, व्हायोलिन आणि पियानो वाजवायला शिकवत असत. मामांच्या चांगल्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमुळे जोसेफला पाकिस्तानात उच्च शिक्षण मिळण्याचे भाग्य लाभले.
५० आणि ६० च्या दशकात अयुब खान पाकिस्तानवर राज्य करत होते आणि पोर्तुगालचा सालाझार यांच्याशी त्यांचे संबंध मैत्रिपूर्ण होते. त्यामुळे गोमंतकीयांना पाकिस्तानात शिकण्याची आणि काम करण्याची मुभा होती, अशी माहिती परेरा यांनी दिली. त्यानंतर १९६४ मध्ये परेरा हे आपल्या कुटुंबाला पाहण्यासाठी मुंबई तीर्थक्षेत्र प्रदर्शनासाठी वाफेच्या बोटीतून गोव्यात परत आले आणि काही दिवसांनी कराचीला परत गेले.
रेफ्रिजरेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर १९७५ मध्ये त्यांनी बहरीनमध्ये "वर्क सुपरवायझर" म्हणून नोकरी स्वीकारली. १९७८ मध्ये त्यांनी गोव्यात येऊन लग्न केले. २०१३ मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले आणि परत गोव्यात त्यांच्या मूळ गावी कासावली येथे आले.
१९८० नंतर अल्पसंख्याकांना केले जातेय टार्गेट
पाकिस्तानच्या तुलनेत भारतामधील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल विचारले असता, परेरा यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचा छळ केला जातो. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांना छोटी कामे आणि अतिशय कमी सुविधा दिल्या जातात.
मातृभूमीची ओढ
नंतर त्यांना पोर्तुगीज नागरिकत्व सहज मिळू शकत असताना भारतीय नागरिकत्व का निवडले, असे विचारले असता, या प्रश्नाचे उत्तर देताना जोसेफ भावुक झाले. ते म्हणाले, परदेशात मला सर्व काही मिळत होते, पण माझी मातृभूमी भारत आणि माझे राज्य गोवा यांची मला आठवण यायची. माझी मातृभूमी, माझे कुटुंब, संस्कृती याविषयी मला तीव्र ओढ आहे म्हणून मला भारतीय नागरिकत्व हवे होते.
...म्हणून भारतच सुरक्षित
ते म्हणाले, अल्पसंख्याकांसाठी राहण्यासाठी, काम करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आणि मुक्तपणे जगण्यासाठी भारत हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. इथे प्रत्येकाला त्यांच्या धार्मिक आणि जातीय विविधतेचा विचार न करता अधिकार, सुविधा आणि समान संधी दिल्या जातात. मला भारतीय नागरिक, म्हणवून घेण्यात अभिमान आणि आनंद वाटतो, असे परेरा म्हणाले.
...आणि विनंती अर्ज मंजूर झाला?
भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या त्यांच्या ११ वर्षांच्या दीर्घ प्रवासाबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, "बऱ्याच संघर्षानंतर मी यावर्षी जूनमध्ये नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि १० दिवसांच्या आत मला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. चार सदस्यांच्या समितीने माझ्या सर्व कागदपत्रांची छाननी केली. जन्म प्रमाणपत्र, पालकांचे प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र इत्यादी तपासण्यात आले. जुलै अखेरीस मला कळविण्यात आले की, माझी भारतीय नागरिकत्व मिळविण्याची विनंती मंजूर झाली आहे. माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण होता" असे परेरा यांनी सांगितले.