रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना भरपाई
By किशोर कुबल | Updated: March 7, 2024 14:44 IST2024-03-07T14:43:45+5:302024-03-07T14:44:15+5:30
रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई देण्यात आली.

रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना भरपाई
किशोर कुबल
पणजी : रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई देण्यात आली. मंत्री मॉविन यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २९६ कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला असून ५ कोटी ७४:लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. भरपाईची रक्कम आणखी वाढवण्याचा सरकार विचार करीत आहे.
रस्ता अपघातात बळी पडलेल्या किंवा कायम अपंगत्व आलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते. अशा प्रकरणात अर्ज आल्यानंतर आठवडाभराच्या आत निकालात काढला जाईल आणि १५ दिवसात नुकसान भरपाईचे पैसे मिळतील, असे मंत्री मॉविन यांनी याआधीच जाहीर केलेले आहे. खात्याने सर्व सोपस्कार सुटसुटीत केले असल्याचे सांगण्यात येते. अपघातात बळी गेल्यास २ लाख रुपये नुकसान भरपाई 'गोवा राज्य रस्ता अपघात बळी अंतरिम भरपाई योजने'खाली मृताच्या कुटुंबीयांना दिली जाते. अनेकदा घरातील कर्ता पुरुष अपघातात ठार होतो किंवा त्याला कायम अपंगत्व येते. अशा परिस्थितीत कुटुंबाचे हाल होतात. त्यामुळे सरकारने ही योजना आणली आहे. अपघात झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत आता वाढवून एक वर्ष करण्यात आलेली आहे.
मॉविन म्हणाले की, कोविडच्या महामारीत सरकारचे आर्थिक उत्पन्न घटले तरीसुद्धा अशा योजनांना सरकारने पैसे कमी पडू दिले नाहीत.