मंत्र्यांमध्ये स्पर्धा अन् वाढले डावपेच; दिल्लीवारीमुळे तर्कवितर्कांना ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2024 08:26 AM2024-08-10T08:26:46+5:302024-08-10T08:27:27+5:30
पक्षनेतृत्वाची करडी नजर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवा मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये एकमेकांवर वरचढ होण्याची स्पर्धा व एकमेकांविरुद्ध शह- काटशहचे डावपेच खेळण्याची शर्यत वाढली आहे. एकमेकांवर राजकीयदृष्ट्या मात करण्यासाठी काहीजणांच्या दिल्लीवाऱ्याही वाढल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला याची कल्पना आलेली आहे.
गुरुवारी गोव्याहून दिल्लीला गेलेले काही मंत्री व आमदार काल, शुक्रवारी सायंकाळी माघारी परतले. मंत्री रोहन खंवटे मात्र दिल्लीतच थांबले व त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. तीन मंत्री व दोन आमदार दिल्लीला पोहचल्याचे वृत्त काल, शुक्रवारी सकाळी 'लोकमत'च्या अंकात प्रसिद्ध झाले. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई व जीत आरोलकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद तानावडे यांची दिल्लीत भेट घेतली, त्याविषयीचा फोटोही 'लोकमत'मध्ये झळकला. त्यानंतर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा वाढल्या. मंत्रीपद मिळविण्यासाठी मगोपचे आमदार आरोलकर हेही प्रयत्नशील आहेत. मात्र आपल्या दिल्ली भेटीचा उद्देश हा मंत्रीपद मिळविणे हा नाही, असे आरोलकर यांनी स्पष्ट केले.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे हेही दिल्लीत आहेत. मात्र ते कुणाची तक्रार करण्यासाठी दिल्लीला गेलेले नाहीत. ते केंद्रीय पर्यटन मंत्री व अन्य काही मंत्र्यांना स्वतंत्रपणे भेटले. अलिकडे सरकारची विविध धोरणे, विविध विधेयके आणि वादग्रस्त निर्णय लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहेत. काही वाद मंत्रिमंडळांमध्येही गाजू लागले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी अजून या वादांविषयी भाष्य केलेले नाही. भाजपच्या कोअर टीमच्या काही सदस्यांमध्ये सरकारचे वादाचे निर्णय, धोरणे व विधेयके याविषयी चर्चा सुरू आहेच. पक्षाला विश्वासात अगोदर घ्या, त्या शिवाय कोणते विधेयक आणू नका, अशी भूमिका कोअर टीमने घेतलेली आहे.
एकमेकांविरुध्द तक्रारी
काही मंत्री मोठमोठे निर्णय घेणे, सल्लागार नेमणे याबाबत स्पर्धेतच उत्तरले आहेत. एकमेकांविरुद्ध स्थानिक नेतृत्वाकडे तक्रारीही केल्या जात आहेत. काही आमदार व मंत्री दिल्लीला गेले तरी, त्यांचा हेतू तक्रारी करणे हा नाही, असे भाजपच्या एका नेत्याने काल 'लोकमत'ला सांगितले. काही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी ठरल्या होत्या, त्यामुळे ते दिल्लीला गेले होते. नव्या संसद इमारतीला भेट देणे हाही दिल्ली भेटीचा हेतू होता. जीत आरोलकर व मंत्री फळदेसाई यांनी खासदार तानावडे यांच्यासोबत नव्या संसद भवनाला भेट दिली.
मंत्री आलेक्स सिक्वेरा हेही दिल्लीत होते. त्यांच्याही काही तक्रारी आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सिक्वेरा हे भाजपला नुवेत मताधिक्य देऊ शकले नाहीत. दिल्ली भेटीवेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल, संतोष यांना काहीजणांनी भेटण्याचा प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही. संतोष यांना गोव्याच्या राजकारणाची पूर्ण कल्पना आहे. आयपीबी विधेयक किंवा महसुल खात्याचे विधेयक किंवा मागे घेतले गेलेले एक टीसीपी
विधेयक याबाबतही संतोष यांना कल्पना आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने तानावडे येत्या १२ रोजी संतोष यांना स्वतंत्रपणे भेटतील. महसुल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गोवा लैंड रिविन्यू कोड (दुरुस्ती) विधेयक नुकतेच विधानसभेत संमत करून घेतले. बिगरगोमंतकीयांना गोव्यात फार्म हाऊसेस बांधणे सोपे जावे म्हणून हे दुरुस्ती बिल आणले गेले, अशी टीका होत आहे.
सदानंद तानावडेंसोबत मी आणि मंत्री फळदेसाई यांनी नवी संसद इमारत पाहिली व ती आम्हाला खूपच आवडली. अतिशय उत्कृष्ट बांधकाम आहे. गळती वगैरे काही नाही. तो अपप्रचार आहे. आमच्यापूर्वी या वास्तूला गोव्याहून कोणतेच मंत्री किंवा आमदार भेट द्यायला पोहचले नव्हते. आम्हीच प्रथम पोहचलो. -
जीत आरोलकर, आमदार