मुख्यमंत्र्यांविरुद्ध बिहार कोर्टात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 01:10 PM2023-05-04T13:10:25+5:302023-05-04T13:11:35+5:30
'गोव्यात परप्रांतीयांकडून गुन्हे केले जातात' या विधानावर तीव्र आक्षेप
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात ९० टक्के गुन्हे उत्तर प्रदेश, बिहारचे परप्रांतीय मजूरच करतात, असे जे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांविरुद्ध पाटणा न्यायालयात तक्रार सादर करण्यात आली आहे.
पाटणा येथील जद (यू) चे नेते मनीषकुमार सिंह यांनी तेथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे ही तक्रार सादर केली आहे. कामगारदिनी येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वरील विधान केले होते. मुख्यमंत्र्यांनी बिहारी व उत्तर प्रदेशमधील नागरिकांचा अपमान केलेला आहे. त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. सिंह यांनी असे म्हटले आहे की, ज्या राज्याने देशाला पहिला राष्ट्रपती दिला व जे राज्य शीख गुरुचे जन्मस्थान आहे, अशा राज्यातील जनतेचा मुख्यमंत्र्यांनी अनादर केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी वरील भाषणात गोव्यात येणाऱ्या बांधकाम मजुरांना लेबर कार्ड सक्तीचे असल्याचे नमूद केले होते.
इथल्या गुन्हेगारांचे काय?
आपचे नेते वाल्मीकी नायक यांनी यावर असे म्हटले आहे की, गुन्हेगारांना शोधायला मुख्यमंत्र्यांना बिहार, उत्तर प्रदेशला जायची गरज नाही. स्वतःच्या मंत्रिमंडळातच पाहावे. ४४ टक्के मंत्र्यांनी स्वतः विरुद्ध बलात्कार, अपहरण, पोलिस स्थानकावरील हल्ला असे गंभीर गुन्हे असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय मंत्र्यांविरुद्ध असलेली भ्रष्टाचार, घोटाळ्यांची प्रकरणे वेगळीच.
माझ्या विधानाचा विपर्यास केला
माझ्या वक्तव्याने कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. जागतिक कामगार दिनी मी कोकणीतून बोललो होते. मजुरांकडून होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास लागावा यासाठी मजुरांना 'लेबर कार्ड' आवश्यक असल्याचे मी म्हटले होते. काही राजकीय नेत्यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला. याच कार्यक्रमात सरकारने वेगवेगळ्या राज्यांमधील मजुरांचा सन्मान केला होता. जे राजकीय नेते आक्षेप घेत आहेत त्यांनी ते पुन्हा एकदा ऐकावे. -डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"