स्मार्ट सिटी बळीप्रकरणी 'आप'कडून शहर पोलिसात कंत्राटदार व इतरांविरुद्ध तक्रार
By किशोर कुबल | Published: January 5, 2024 01:49 PM2024-01-05T13:49:26+5:302024-01-05T13:50:38+5:30
प्रसंगी हायकोर्टातही जाऊ: अमित पालेकर
किशोर कुबल, पणजी : मळा येथे स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून आयुष हळर्णकर या माजी नगरसेवकपुत्राच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर व नेते वाल्मिकी नायक यांनी शहर पोलिसात कंत्राटदार तसेच इतर संबंधितांविरुद्ध तक्रार सादर केली आहे. प्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेस जबाबदार असलेल्या प्रत्येकावर गुन्हा नोंदवून कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रार सादर केल्यानंतर आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदार बागकिया कन्स्ट्रक्शनचे संचालक, इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, महापालिका अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच 'सुडा'चे अधिकारी, जे कोणी या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.केवळ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ खाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून भागणार नाही. या सर्वाना कठोर कलमे लावावी लागतील.'
ॲड. पालेकर पुढे म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या बेदबाबदारपणामुळेच हा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे हा एक फौजदारी गुन्हा ठरतो परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने आम्ही कंत्राटदाराच्या नावासह तक्रार दिलेली आहे तसेच स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्या प्रकरणी ही कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. कुठलाही कंत्राटदार त्याला अभय असल्याशिवाय एवढा बेजबाबदारपणे वागणार नाही.'
ॲड. पालेकर म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल सावळा गोंधळ चालू आहे. डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा फोडले जातात. काही ठिकाणी तर हॉटमिक्स केलेल्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. जनतेच्या करांचा पैशांचा हा अपव्यय आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून संबंधितावर कारवाई करायला हवी.
दरम्यान, वाल्मिकी नायक यांनी राजधानी शहरात ठीकठिकाणी फिरून अजूनही खड्ड्यांच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केलेली नाही त्याचे फोटो काढून पोलिसांना दिलेले आहेत.
वाल्मिकी म्हणाले की, 'राजधानी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. पाच ते सात फूट खड्डे खोदून ठेवले आहेत. असे मोठे खड्डे खोदले जातात त्यावेळी त्याला बॅरिकेड्स घालणे, रात्रीच्या वेळी ब्लिंकरिंग दिव्यांची व्यवस्था करणे, नियॉन रिबन बांधणे आवश्यक असते. अशी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. स्मार्ट सिटीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. काम चालू असताना अनेक अपघात घडले तसेच अजूनही रस्ते खचतच आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.