१५ जूनपर्यंत कामे संपवा; 'स्मार्ट सिटी'ला नवी डेडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 10:56 AM2023-05-19T10:56:53+5:302023-05-19T10:58:01+5:30
संजीत रॉड्रिग्ज यांच्याकडे ताबा.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'स्मार्ट सिटी'च्या रखडलेल्या कामांमुळे येत्या पावसाळ्यात पणजी तुंबणार, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल याप्रश्नी कंत्राटदार, सल्लागार व संबंधित खातेप्रमुखांची बैठक घेऊन १५ जूनपर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी नवी डेडलाइन दिली आहे.
दुसरीकडे इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय व संचालकपदाचा ताबा संजीत रॉड्रिग्ज यांच्याकडे देण्यात आला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, स्मार्ट सिटीची कामे ठरल्याप्रमाणे वेळेत झालेली नाहीत. त्यामुळे आता ताबा महापालिकेचे माजी आयुक्त व स्मार्ट सिटीच्या कामाचे अनुभवी अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांच्याकडे द्यावा लागत आहे. संजीत यांनी यापूर्वी महापालिकेत आयुक्त म्हणून बरीच वर्षे काम केले आहे. तसेच अमृत मिशनच्या कामाचाही त्यांना अनुभव आहे. ते आयएएस अधिकारी असून सध्या नागरी पुरवठा व गृहनिर्माण खात्याचे सचिव आहेत.
खोदून ठेवलेले रस्ते तसेच इतर कारणामुळे यंदा पावसाळ्यात पणजी शहर बुडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत होता. अलीकडेच बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी पाहणी केली. तेव्हा त्यांनी या कामावरून हात वर केले होते. कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्य नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले होते. त्यानंतर पणजीवासीयांमध्ये संताप पसरला होता.
आता दिवस-रात्र काम करा
मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीच्या कामांसंदर्भात बैठक घेतली आणि सर्व संबंधितांना कामे १५ जूनपर्यंत कामे हातावेगळी करा, असे निर्देश दिले आहेत. सकाळच्या सत्रात पहिली पाळी, दुपारनंतर दुसरी आणि रात्रपाळी अशा तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र कामगार युद्धपातळीवर काम करतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- मुख्यमंत्र्यांनी काल स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामांबद्दल कंत्राटदार, सल्लागार यांची बैठक घेत आढावा घेतला.
- बैठकीला विविध खातेप्रमुखही उपस्थित होते. १५ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- पणजी बुडणार की नाही, याबाबत काहीच सांगू शकत नसल्याचे मंत्री काब्राल व महापौर मोन्सेरात यांनी सांगताच पणजीवासीयांत तीव्र संताप पसरला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत सूचना केल्या.
- खोदून ठेवलेले रस्ते तसेच इतर कारणामुळे यंदा पावसाळ्यात पणजी शहर बुडण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून स्मार्ट सिटीची कामे हातावेगळी न केल्यास पावसाळ्यात लोकांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जावी, अशी ही त्यांची मागणी आहे.