कोंकणी मातृभाषा मानणा-यांची संख्या घटल्याने सोशल मीडियावरून चिंता व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 01:37 PM2018-06-29T13:37:36+5:302018-06-29T13:38:28+5:30
देशभरातील कोणत्या भागात किती लोकांची मातृभाषा कोणती आहे, याविषयीचा जनगणना अहवाल आता जाहीर झाला आहे.
पणजी : देशभरातील कोणत्या भागात किती लोकांची मातृभाषा कोणती आहे, याविषयीचा जनगणना अहवाल आता जाहीर झाला आहे. कोंकणी मातृभाषा मानणा-यांची संख्या देशभरच 2.32 लाखांनी घटल्याचे ताज्या अहवालातून उघड झाल्याने गोव्यात त्याविषयी विशेष चिंता व्यक्त होऊ लागली आहे. शुक्रवारी सोशल मीडियावरून याविषयी चर्चा सुरू झाली असून स्थानिक भाषांविषयी जागृत असलेले अनेक गोमंतकीय खेद व्यक्त करू लागले आहेत. महाराष्ट्रातील 3 लाख 99 व्यक्तींनी आपली मातृभाषा कोंकणी असल्याचे म्हटले आहे.
पंधरा लाख लोकसंख्येच्या गोव्यात 9 लाख 64 हजार लोकांनी आपली मातृभाषा कोंकणी असल्याची नोंद केली आहे. तसेच 1 लाख 58 हजार गोमंतकीयांनी आपली मातृभाषा मराठी असल्याचे म्हटले आहे. देशभरातील आकडेवारी पाहिल्यास एकूण 22 लाख 56 हजार व्यक्तींनी आपली मातृभाषा कोंकणी असल्याची नोंद केली आहे. कोंकणी ही केवळ गोव्यातच आहे असे नाही तर कर्नाटक, केरळमधील काही भागांसह अन्यत्रही कोंकणी मातृभाषा असलेले लोक सापडतात.
एकूण बावीस मातृभाषकांपैकी कोंकणी व उर्दू या दोन मातृभाषकांचे प्रमाण घटले आहे. 2001 साली झालेल्या जनगणनेवेळी देशभरातील एकूण 24 लाख 89 हजार व्यक्तींनी आपली मातृभाषा कोंकणी असल्याची नोंद केली होती. मात्र दहा वर्षात म्हणजे 2011 साली झालेल्या जनगणनेवेळी हे प्रमाण 2.32 लाखांनी घटल्याचे आढळून आले. यामागील कारणमिमांसा कोंकणी भाषा क्षेत्रतील लोक आता सोशल मीडियावरून करू लागले आहेत. 2011 च्या जनगणनेवेळी 22 लाख 56 हजार 502 व्यक्तींनी आपली मातृभाषा कोंकणी असल्याची नोंद केली. यात एका गोव्यातील 9 लाख 64 हजार व्यक्तींचा समावेश आहे.
कर्नाटकमध्ये 7 लाख 88 हजार व्यक्तींनी आपली मातृभाषा कोंकणी असल्याचे नमूद केले आहे असे जनगणना अहवाल सांगतो. केरळमध्ये 69 हजार, गुजरातमध्ये 5 हजार तामिळनाडूत 6 हजार तर दिल्लीत 1 हजार 553 व्यक्तींनी आपली मातृभाषा कोंकणी असल्याची नोंद केली आहे. गोव्यात परप्रांतांमधील मजूर मोठ्या संख्येने येऊन स्थायिक झाले आहेत. त्यामुळे गोव्यातील सुमारे 70 हजार व्यक्तींनी आपली मातृभाषा कन्नड असल्याची नोंद केली आहे. 41 हजार गोमंतकीयांनी आपली मातृभाषा उर्दू असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, कोंकणी मातृभाषा मानणा-यांची संख्या घटत असल्याविषयी कोंकणी भाषिकांनी विचार करण्याची गरज आहे असे मत ट्विटर व फेसबुकवरून जागृत घटक व्यक्त करू लागले आहेत. गोव्यात अनेकजण घरात इंग्रजी बोलतात. यात बहुतांश ख्रिस्ती धर्मिय बांधवांचा समावेश आहे. मराठी बोलणारेही गोव्यात खूप आहेत. मात्र जे घरात कोंकणी बोलतात, ते देखील आपली मातृभाषा मराठी आहे असे सांगतात अशी हजारो कुटुंब गोव्यात सापडतात.