कुजिरा येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर चिंता; चाकू हल्ल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक
By पूजा प्रभूगावकर | Published: April 5, 2024 04:33 PM2024-04-05T16:33:08+5:302024-04-05T16:33:43+5:30
विद्यार्थ्यांवरील चाकू हल्ल्याप्रकरणी आगशी पोलिसांनी चौथ्या संशयिताला घेतले आहे.
पणजी: बांबोळी येथील कुजिरा शिक्षण संकुलात झालेल्या चाकु हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालक व शिक्षकांकडून चिंता व्यक्त होत आहे. अशातच शाळा व्यवस्थापनांनीही पोलिसांकडे या ठिकाणी नियमित गस्त घालावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांवरील चाकू हल्ल्याप्रकरणी आगशी पोलिसांनी चौथ्या संशयिताला घेतले आहे. ताळगाव येथील सुर्या कांबळे याला गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली. कांबेळे हा सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
चाकू हल्ल्याची ही घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनुी यापूर्वीच जोशुआ झव्हियर, शोएब बेग व झकुल्ला काझी या तिघांना अटक केली असून ते सध्या सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत. य घटनेमुळे कुजिरा शिक्षण संकुलात खळबळ उडाली आहे. तसेच एकूणच याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.