गोव्यात नोकर भरतीवेळी गुजराती भाषेची अट, वादानंतर सरकारकडून जाहिरात मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:25 PM2018-09-29T12:25:53+5:302018-09-29T12:29:30+5:30
गोवा सरकारच्या मच्छीमार खात्यात वाहन चालक पदावरील भरतीसाठी अर्जदाराला गुजराती भाषेचे ज्ञान असावे अशी अट लागू करून मच्छीमार खात्याने खळबळ उडवून दिली.
पणजी - गोवा सरकारच्या मच्छीमार खात्यात वाहन चालक पदावरील भरतीसाठी अर्जदाराला गुजराती भाषेचे ज्ञान असावे अशी अट लागू करून मच्छीमार खात्याने खळबळ उडवून दिली. कोंकणीच्या ज्ञानाची सक्ती असावी व मराठीचे ज्ञान ऐच्छीक असावे असा गोवा सरकारचा नियम असता तरी, त्यात मच्छीमार खात्याने मात्र गुजराती भाषेचीही अट टाकल्याने सोशल मीडियावरून टीका सुरू झाली. मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी याची गंभीरपणे दखल घेतली व जाहिरात त्वरित मागे घेण्याची सूचना मच्छीमार खात्याच्या संचालकांना केली आहे.
केवळ एका वर्षासाठी कंत्राट पद्धतीवर मच्छीमार खात्यात वाहन चालकाची भरती करण्यासाठी मच्छीमार खात्याने प्रसार माध्यमांमध्ये जाहिरात देऊन इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले. गोव्यात कधीच गुजराती भाषेचे ज्ञान उमेदवाराला असावे अशी अट लागू केली जात नाही. सरकारी व खासगी नोकर भरतीवेळीही अशी अट लावली जात नाही. मात्र मच्छीमार खात्यातील काही अधिकाऱ्यांनी तो पराक्रम करून दाखवला आहे. उमेदवाराला कोंकणीचे ज्ञान असावे आणि मराठी किंवा गुजरातीचे ज्ञान असावे अशा प्रकारची अट जाहिरातीत पाहून गोमंतकीयांना धक्का बसला. गुजराती भाषेच्या ज्ञानाची अट आलीच कुठून असा प्रश्न लोकांनी विचारण्यास आरंभ केला.
सोशल मीडियावरून जोरदार टीका सत्र झाल्यानंतर सरकारमधील काही मंत्र्यांनी या टीकेची दखल घेतली. मच्छीमार खात्याचे मंत्री पालयेकर हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यापर्यंत हा विषय पोहचल्यानंतर त्यांनी शनिवारी सकाळी मच्छीमार खात्याच्या संचालकांना फोन केला व आपली नाराजी व्यक्त केली. ही जाहिरात मागे घ्यावी अशी सूचना मंत्री पालयेकर यांनी खात्याच्या वरिष्ठांना केली. आपण जाहिरात मागे घेण्यास सांगितले असून ज्यांनी ही चूक केली आहे, त्यांच्याविरोधात योग्य ती पाऊले उचलली जातील, असा इशाराही पालयेकर यांनी दिला आहे. अशा प्रकारची अट लागू करून जाहिरात देण्याची कृती ही कधीच स्विकारार्ह नाही, असे मंत्री पालयेकर म्हणाले.