मुरगाव नगराध्यक्ष भावना नानोस्कर यांच्या विरुद्ध १३ मताने अविश्वास ठराव संमत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 04:17 PM2018-10-12T16:17:34+5:302018-10-12T16:17:41+5:30
मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा भावना नानोस्कर यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठराव नोटिसीबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि.१२) बोलवलेल्या बैठकीत २५ पैंकी १३ नगरसेवकांनी हात उभारून अविश्वास ठरावाला पाठिंबा देऊन त्यांना ह्या पदावरून हटविले.
वास्को: मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा भावना नानोस्कर यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठराव नोटिसीबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि.१२) बोलवलेल्या बैठकीत २५ पैंकी १३ नगरसेवकांनी हात उभारून अविश्वास ठरावाला पाठिंबा देऊन त्यांना ह्या पदावरून हटविले. दोन महिन्यांपूर्वी आपल्याला नगराध्यक्ष बनविल्यानंतर आता ह्या पदावरून हटवण्यासाठी आपल्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असून, मागच्या दोन महिन्यांत ह्या गटातील काही नगरसेवकांनी केलेल्या गैर प्रकारांची चौकशी विजिलन्स खात्याकडून करण्याची गरज असल्याचे नानोस्कर यांनी बैठकीच्या वेळी सांगून अविश्वास ठरावाचा निकाल जाणून घेण्यापूर्वीच त्या बैठक सोडून निघून गेल्या.
नगराध्यक्ष भावना याच्याविरुद्ध मागच्या आठवड्यात १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव नोटिसीवर सही करून ती पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केली होती. याबाबत निर्णय जाणून घेण्यासाठी शुक्रवारी पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली. मुरगाव नगरपालिकेत एकूण २५ नगरसेवक असून, चार नगरसेवक वगळता इतर सर्वांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. मडगावचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक ह्या बैठकीला निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहिले असून, यावेळी मुरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिससुद्धा उपस्थित होते. सुरुवातीला सत्ताधारी गटातील ज्या नगरसेवकांनी नानोस्कर यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव नोटीसीवर सही केली होती, त्यांना बैठकीत बोलण्यासाठी वेळ दिला असता अविश्वास ठराव नोटिसीवर आम्ही कारणे नमूद केल्याचे नगरसेवकांनी सांगून त्यांनी ह्या बैठकीच्या वेळी गप्प राहण्यास पसंत केले.
नंतर राहिलेल्या नगरसेवकांना बोलण्याची संधी दिली असता माजी नगराध्यक्ष दिपक नाईक तसेच नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी भावना नानोस्कर यांना ह्याच नगरसेवकांनी दोन महिन्यापूर्वी निवडून आणले असून अशा प्रकारे त्यांच्यावर अविश्वास ठराव जारी करून चुकीचे काम केल्याचे म्हणाले. भावना यांनी गुरुवारी पत्रकार परिषद देऊन काही नगरसेवकांवर आरोप केलेले असून त्यांच्या ह्या आरोपांना यतीन यांनी पाठिंबा देत दोन महिन्यांच्या काळात तिने कुठल्याच प्रकारची चुकीची गोष्ट केलेली नसल्याचे म्हणाले. भावना विरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव मागे घ्या, अशी विनंती त्यांनी ह्या बैठकीच्या वेळी केली.
यानंतर नगराध्यक्ष भावना यांना बोलण्याची संधी दिली असता आपल्या विरुद्ध करण्यात आलेले सर्व अरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांविरुद्ध आपण केलेले आरोप खरे असल्याचे भावना यांनी बैठकीच्या वेळी स्पष्ट केले. मागच्या दोन महीन्यात आपल्याकडून सत्ताधारी गटातील काही नगरसेवक चुकीची कामे करून घेण्याचे प्रयत्न करत होते, मात्र यास आपण विरोध केल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. ह्या दोन महीन्याच्या काळात पालिकेत झालेल्या कारभाराबाबत विजिलन्स चौकशी होणे गरजेचे असल्याचे भावना यांनी बैठकीच्या वेळी सांगून नंतर त्या बैठक सोडून निघून गेल्या. यानंतर अविश्वास ठरावाला ज्या नगरसेवकांचा पाठिंबा आहे त्यांनी हात वर काढावे असे निर्वाचन अधिकाऱ्याने सांगितले असता १३ नगरसेवकांनी ह्या ठरावाला मान्यता देऊन भावना नानोस्कर यांना ह्या पदावरून हटविले.
मुरगाव पालिकेची नगराध्यक्ष पदाची रिक्त झालेली खुर्चीवर नवीन नगराध्यक्षांना विराजमान करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. पुढचा नगराध्यक्ष कोण बनणार अशी चर्चा सध्या वास्को शहर व जवळपासच्या भागात चालू असून, गोव्याचे नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचे जवळीक नगरसेवक क्रितेश गावकर यांना नगराध्यक्ष बनण्याचा मान मिळू शकतो अशी जास्त शक्यता निर्माण झाली असली तरी नगराध्यक्ष निवडणुकीनंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.