पणजी महापालिका-जीएसआयडीसी पुन्हा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:32 PM2020-06-02T22:32:57+5:302020-06-02T22:33:53+5:30
गटारांवर पदपथ बांधल्यानेच पाणी तुंबल्याचा महापौरांचा आरोप
पणजी : बाल भवनजवळ तसेच मिरामार सर्कलवर काल पहिल्याच पावसात पाणी तुंबले. या ठिकाणी गटारावर पदपथाचे बांधकाम केल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप करीत महापौर उदय मडकईकर यांनी पुन्हा एकदा साधनसुविधा विकास महामंडळाला तसेच माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांना लक्ष्य बनविले. यावरुन मनपा आणि महामंडळ यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे.
मडकईकर म्हणाले की, ‘बाल भवनसमोर स्मार्ट सिटी अंतर्गत मोठा खर्च करुन फुटपाथ बांधण्यात आली आहे. नेमके गटारांवरच पदपथ बांधल्याने गेल्या डिसेंबरमध्ये साधन सुविधा विकास महामंडळाच्या निदर्शनास हा प्रकार आणून पावसाळ्यात पाणी तुंबणार याची कल्पना आम्ही दिली होती परंतु काम चालूच ठेवण्यात आले. माजी आमदार कुंकळ्येंकर यांच्या सांगण्यावरुन हे काम चालू ठेवण्यात आले. मिरामार-दोनापॉल काँक्रिट रस्त्याच्या बाबतीतही असाच प्रकार घडलेला आहे. तेथेही गटारे बुजविल्याने पाणी तुंबते. क्रॉस ड्रेन बांधून पुढील दोन दिवसात या समस्येवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु समस्या न सुटल्यास मात्र संपूर्ण फुटपाथ फोडावी लागेल आणि त्याशिवाय पर्याय राहणार नाही.’
पाणी तुंबल्यावर सायंकाळी साधन सुविधा विकास महामंडळाच्या अधिकाºयांसोबत महापौरांनी भेट देऊन पाहणी केली. काल पावसाच्या पहिल्याच दणक्यात वरील दोन ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले.
आमदार बाबुश मोन्सेरात यांनी सायंकाळी उशिरा स्मार्ट सिटीच्या अधिकाºयांना गटारांचे हे काम करुन देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘असल्या आरोपांची मी पर्वा करत नाही. मिनीन डिक्रुझ यांनी मार्केट समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला तो का दिला हे तपासा. एकेक सहकारी का सोडून जाऊ लागला आहे हे तपासून पहा. यापेक्षा अधिक काही मला बोलायचे नाही.’