गोव्यात किनाऱ्यांवर देशी पर्यटक आणि जीवरक्षकांमध्ये संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 07:03 PM2019-11-14T19:03:28+5:302019-11-14T19:08:48+5:30
जगात प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर अलिकडे जीवरक्षक विरुद्ध उत्साही पर्यटक असा संघर्ष होत आहे.
पणजी : जगात प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर अलिकडे जीवरक्षक विरुद्ध उत्साही पर्यटक असा संघर्ष होत आहे. खोल समुद्रात उतरू नका अशा सूचना जीवरक्षकांकडून पर्यटकांना केल्या जात असल्या तरी, विशेषत: देशी पर्यटक जीवरक्षकांशी हुज्जत घालतात असे आढळून येत आहे. देशी पर्यटक जीवरक्षकांच्या सूचना ऐकत नाहीत याची दखल सरकारी यंत्रणोनेही घेतली आहे.
गोव्यात वार्षिक साठ लाखांपेक्षा जास्त पर्यटक येतात. यात 45 लाख देशी पर्यटकच असतात. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळवाडू, गुजरात, राजस्तान व दिल्ली या सात राज्यांतून बहुतांश देशी पर्यटक गोव्यात येतात. गोव्याचा समुद्र जेव्हा खवळलेला असतो तेव्हा समुद्रात पोहण्यासाठी उतरणो हे अत्यंत धोक्याचे असते. पर्यटक ज्या हॉटेलात राहिलेले असतात, ते हॉटेल व्यवसायिकही पर्यटकांना समुद्रात न उतरण्याविषयी सूचना करतात पण काही पर्यटक मद्याच्या आहारी जातात व मग ते हॉटेल व्यवसायिकांचीही विनंती ऐकत नाहीत. तसेच किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी केलेली सूचनाही ऐकत नाहीत. यावरून मग अलिकडे जीवरक्षक विरुद्ध पर्यटक असे खटके उडू लागले आहेत.
राज्याला 105 किलोमीटर लांबीचा सागकिनारा लाभला आहे. बहुतांश जगप्रसिद्ध किनारे हे उत्तर गोव्यात येतात आणि बुडून मृत्यू पावण्याच्या बहुतेक घटनाही उत्तर गोव्याच्याच समुद्रात घडत आहेत. किनाऱ्यांवर सध्या लाल रंगाचे फलक लावले जात आहेत. विदेशी पर्यटक जीवरक्षकांच्या सूचना ऐकतात व खोल समुद्रात उतरणो टाळतात पण देशी पर्यटक ऐकत नाहीत व यामुळे बहुतांश बळी हे देशी पर्यटकांचेच जातात. या मोसमात आतार्पयत सातजणांचे बळी गेले तर सुमारे तीनशेजणांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. यापुढे पर्यटकांनी जीवरक्षकांच्या सूचना ऐकल्या नाहीत तर अशा पर्यटकांना ताब्यात घेण्याची कारवाई पोलिस करतील. त्यासाठीच काही किनाऱ्यांवर यापुढे पोलिस नेमले जाणार आहेत.