तिंरगा फडकविण्यासाठी काँग्रेसचे राज्यपालांना साकडे, सभापतींना आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:26 PM2018-08-11T22:26:15+5:302018-08-11T22:26:26+5:30
भारतीय स्वातंत्र्यदिनी येत्या 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणा-या सोहळ्य़ावेळी राज्यपालांनी स्वत: तिरंगा ध्वज फडकवावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
पणजी : भारतीय स्वातंत्र्यदिनी येत्या 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणा-या सोहळ्य़ावेळी राज्यपालांनी स्वत: तिरंगा ध्वज फडकवावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्य़ाला अनुपस्थित राहिले तरी, त्यांच्या अनुपस्थितीत सभापतींकडे तिरंगा फडकविण्याची जबाबदारी सोपवून पर्रीकर यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर हे आजारी असल्याने उपचारांसाठी अमेरिकेला गेले आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिन हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, त्या दिवशी होणा-या राष्ट्रीय सोहळ्य़ावेळी मुख्यमंत्र्यांनी गोव्यात उपस्थित असू नये ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे. भारतीय स्वातंत्र्यदिन नजरेसमोर ठेवून पर्रीकर यांना त्यांच्या अमेरिका भेटीविषयी योग्य पद्धतीने नियोजन करता आले असते. तथापि, ते गोव्याबाहेर गेलेले असले तरी, त्यांनी सभापतींकडे तिरंगा फडकविण्याचे काम सोपवून चुकीची कृती केली आहे, सरकारचा पक्षपातीपणा यावरून दिसून येतो, असे चोडणकर यांचे म्हणणे आहे.
सभापती हे निपक्षपाती असतात. सभापती ही एक स्वतंत्र संस्था असते व त्यांना सरकारच्या कामकाजाशी काही देणोघेणो नसते. सरकारमधील एखादा ज्येष्ठ मंत्री किंवा अन्य कोणत्याही मंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविण्याची जबाबदारी द्यायला हवी होती. र्पीकर यांनी तसे केले नाही याची दखल राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी घ्यावी व राज्यपालांनी स्वत: तिरंगा फडवून शान राखावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
देशात कुठेच कधी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत भारतीय स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय सोहळ्य़ावेळी सभापतींनी तिरंगा फडकविल्याचे उदाहरण नाही असे चोडणकर यांचे म्हणणे आहे. विद्यमान सरकारमध्ये काही ज्येष्ठ मंत्री आहेत, तरी देखील मंत्र्यांकडे तिरंगा फडकविण्याचा मान न सोपविता पर्रीकर यांनी सभापतींकडे तो सोपवला असे चोडणकर यांनी राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनातही नमूद केले आहे.
मंत्र्यांमध्येही चर्चा
दरम्यान, विरोधी काँग्रेसने हा विषय लावून धरल्यानंतर त्यावरून मंत्र्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या दिनी पणजीतील मुख्य सोहळ्य़ावेळी आमच्याकडे मुख्यमंत्र्यांनी तिरंगा फडकविण्याचे काम का सोपविले नाही असा प्रश्न काही मंत्र्यांनाही पडला आहे. काही मंत्री तालुकास्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी ङोंडा फडकवतील. मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे यावेळी म्हापशात तिरंगा फडकवणार नाहीत, कारण ते आजारी आहेत. तिथे महसुल मंत्री रोहन खंवटे हे ध्वज फडकावतील. आरोग्य मंत्री विश्वजित राणो हे वाळपईत तिरंगा फडकविणार नाहीत. त्यामागिल नेमके कारण कळाले नाही. वाळपईच्या मामलेदारांच्या हस्ते तिरंगा फडकविला जाईल.