काँग्रेसचाही जि. पं. निवडणुकीवर बहिष्कार
By Admin | Published: February 24, 2015 03:01 AM2015-02-24T03:01:45+5:302015-02-24T03:05:43+5:30
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर होणार असल्या, तरी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर होणार असल्या, तरी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उतरणार नाही. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सोमवारी सकाळी झाली. या बैठकीत जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. निवडणुकीत पक्ष म्हणून न उतरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस यतीश नाईक यांनी दिली. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह या निवडणुकीत दिसणार नाही, हे निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय या पूर्वीच जाहीर केला आहे, तर दुसरीकडे भाजप-मगो युती करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
तशी युती झाल्यास या निवडणुकीत युतीला कुठल्याही पक्षाचे आव्हान
उरणार नाही.
प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सोमवारी प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि इतर पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दोन तास चाललेल्या चर्चेत बहुतेक सदस्यांनी निवडणूक न लढविणे योग्य होणार असल्याची मते व्यक्त केली. जिल्हा पंचायत मतदारसंघांची नव्याने करण्यात आलेली फेररचना भाजपला सोयीस्कर असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. निवडणुकीचे निकाल विपरीत लागल्यास पक्षाची नाचक्की होईल, अशी भीतीही काही सदस्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस पक्ष निवडणुका लढविणार नसला, तरी भाजप उमेदवाराच्या विरोधात चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. चांगले उमेदवार कधी ठरविणार, असे विचारले असता, नामांकने दाखल झाल्यानंतर रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकीच ते ठरविणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस
आणि सरचिटणीस सुनील कवठणकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)