गोवा सरकारच्या आर्थिक धोरणांवर काँग्रेसचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:18 PM2019-10-01T13:18:23+5:302019-10-01T13:18:46+5:30
रस्ता करात ३ महिन्यांसाठी ५० टक्क्यांच्या कपातीच्या घोषणेला आक्षेप
पणजी : रस्ता करात ५० टक्के कपात केल्याने त्याचा लोकांना फायदा होईल असे भासवण्याचा प्रयत्न करुन सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज जनतेकडे नवीन वाहन विकत घेण्यासाठी आर्थिक शक्तिच राहिली नसल्याचे सांगून, कर कपातीची घोषणा ही निव्वळ धूळफेक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यानी म्हटले आहे.
अर्थ खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या आर्थिक निर्णयाची घोषणा वाहतूकमंत्री कशी काय करु शकतात, असा सवाल करत त्यांनी माविन गुदिन्हो हे भरकटलेल्या भाजप सरकारचे नवे अर्थमंत्री आहेत का असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारला आहे. चुकीची धोरणे व बडेजाव यामुळे डबघाईस आलेली देश व राज्याची अर्थव्यवस्था सांभाळण्याची कसरत करत असताना आता प्रत्येक दिवशी नवीन अर्थसंकल्प सादर होणार का, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी चोडणकर यानी केली आहे.
भाजप केडरमध्ये आरएसएसची ध्येय धोरणे व तत्वप्रणाली असते असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यानी मडगावात केले होते. त्याचा समाचार घेताना चोडणकर यांनी गोवा विधानसभेत संमत झालेल्या अर्थसंकल्पाला फाटा देऊन केलेल्या आर्थिक घोषणा या संघाच्या 'अर्थशास्त्रा' प्रमाणे आहेत का, असा प्रश्न विचारला. केंद्र व राज्य सरकारच्या भरकटलेल्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून, जनतेला आज दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तात्पुरत्या घोषणा करण्यापेक्षा सरकारने दूरगामी विचार करुन अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करावेत, नपेक्षा खुर्ची सोडावी, अशी मागणी चोडणकर यानी केली आहे.
भारतीय रिजर्व बॅंकेचे १.७४ लाख कोटी रुपये मोदी सरकारने घेतल्याचा परिणाम म्हणूनच आज देशातल्या बँका एका मागोमाग एक दिवाळखोरी जाहीर करत असल्याचे चोडणकर यांनी म्हटले. लोकांना आज बँकेत पैसे ठेवणे असुरक्षित वाटत असून, घरात पैसे ठेवायचा विचार केल्यास नोटाबंदीचे भूत समोर दिसते. भाजप सरकारने जनतेचा मानसिक छळ चालवला असून लोकांचे शाप भाजपाला लागणार आहेत, असे चोडणकर म्हणाले.
केवळ पंतप्रधान मोदींचा व्यक्तिगत सोस पुरविण्यासाठी लाखो कोटी खर्च करून देश परदेशात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, टेलिप्राऊंटरवरची भाषणे वाचण्याचे व फोटो काढून घेण्याचे व्यसन मोदींना लागले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे नाव घेऊन लोकांना तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा त्यांचा मोहनलाल असा उल्लेख करुन अपमान केला आहे, असे चोडणकर पुढे म्हणाले.