पाण्यासाठी काँग्रेस करणार खुर्ची आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:15 PM2018-01-29T20:15:43+5:302018-01-29T20:15:46+5:30
उन्हाळा सुरू होण्यापूर्वी म्हापसा शहरातील लोकांना उद्भवलेल्या पाण्याच्या प्रश्नावरुन काँग्रेस पक्षाने खुर्ची आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हापसा : उन्हाळा सुरू होण्यापूर्वी म्हापसा शहरातील लोकांना उद्भवलेल्या पाण्याच्या प्रश्नावरुन काँग्रेस पक्षाने खुर्ची आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘काम करा अथवा खुर्ची घेऊन घरी आराम करा’ असा सल्ला काँग्रेस आंदोलनातून देणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाने पुढील दोन दिवसात पाण्याचा पुरवठा सुरळीत न केल्यास अधिकाºयांना आराम खुर्च्या भेट स्वरुपात दिल्या जातील अशी माहिती काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके यांनी दिली.
शहरातील लोकांना मागील दहा दिवसांपासून पाण्यापासून वंचित रहावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकांना होणाºया त्रासाला खात्याचे अधिकारी कारणीभूत असल्याने आपल्या कार्यालयात बसून आराम करण्यापेक्षा या अधिकाºयांना खुर्च्या भेट देऊन घरी बसण्याचा सल्ला आंदोलनातून देणार असल्याचे भिके पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
शहराला होणारा पाणी पुरवठा इतरत्र वळवण्यात येत असल्याचा आरोप भिके यांनी करुन पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा पुरवठा हॉटेल्ससाठी करण्यात येत असून सामान्य लोकांच्या हितावर दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हॉटेलच्या पाण्याच्या मीटरची तपासणी करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
सरकार लोकांच्या प्रश्नावर दुर्लक्ष झाले असल्याने मागील १० दिवसापासून लोकांना पाणी मिळणे कठिण झाले असल्याचे भिके म्हणाले. म्हापशाचे आमदार तथा शहर विकासमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी या मुद्यावरुन खात्याच्या पाणी विभागावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. त्यांनी मोर्चा नेला तर लोकांच्या हितासाठी काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसोझा यांनी केलेल्या व्यक्तव्यावरुन त्यांना सरकारात कोणते स्थान आहे हे स्पष्ट होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भिके यांनी उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यावरही टिका केली. म्हापशातील लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वत:कडे येण्याचा सल्ला देणाºया लोबो यांनी सल्ला देण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा अशी मागणी केली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे स्वत: म्हापसा शहरातील असून तेच स्वत: या शहराला सावत्र वागणूक देऊ लागले असल्याचा आरोप काँग्रेस नेते सुदीन नाईक यांनी केला. शहराला पाणी मिळत नाही व दुसºया बाजूने मुख्यमंत्री म्हादईचे पाणी कर्नाटकाला देण्यासाठी सरसावले आहेत. यातून आपले मुख्यमंत्री तसेच सरकार किती कार्यक्षम आहेत हे सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.