काँग्रेसचा सभात्याग, राज्यपालांचा निषेध

By Admin | Published: March 24, 2017 02:39 AM2017-03-24T02:39:19+5:302017-03-24T02:39:31+5:30

पणजी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ उमेदवार निवडून आले. काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष ठरला; पण तुम्ही आम्हाला सरकार

Congress closure, governance protests | काँग्रेसचा सभात्याग, राज्यपालांचा निषेध

काँग्रेसचा सभात्याग, राज्यपालांचा निषेध

googlenewsNext

पणजी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ उमेदवार निवडून आले. काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष ठरला; पण तुम्ही आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलविले नाही, तुम्ही लोकशाहीचा खून केला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपालांवर टीका केली. राज्यपालांचा निषेध करत विरोधी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी अभिभाषणावेळी सभात्याग केला व अभिभाषणावर बहिष्कार टाकला.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. गुरुवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे अभिभाषण झाले. राज्यपालांनी अभिभाषणास आरंभ करावा, अशी सूचना सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी करताच विरोधी पक्षनेते कवळेकर ‘पॉइंट आॅफ आॅर्डर’ म्हणत उभे राहिले. त्यामुळे राज्यपाल थांबल्या. आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावेळी व्यत्यय किंवा अडथळे आणणार नाही. मात्र, आम्ही राज्यपालांचा निषेध करतो; कारण त्यांनी १७ आमदार निवडून आलेल्या व सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसवर अन्याय केला, असे कवळेकर म्हणाले. अन्य काँग्रेस आमदारांनीही कवळेकर यांना साथ दिली.
काँग्रेसचे सगळे आमदार राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात दंडाला काळी फीत बांधून आले होते. कवळेकर यांच्यासह प्रतापसिंग राणे, दिगंबर कामत, लुईझिन फालेरो, रवी नाईक आदी सर्व ज्येष्ठ आणि नव्या आमदारांनी काळी फीत बांधून राज्यपालांचा निषेध केला. कवळेकर निषेध करत असताना राज्यपालांनी अभिभाषण सुरू केले व त्या वेळी काँग्रेसचे सगळे आमदार उठून उभे राहिले व त्यांनी राज्यपालांविरुद्ध वक्तव्य करत सभात्याग केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी या निषेधात भाग घेतला नाही. ते सभागृहातच बसून राहिले. विरोधक बाहेर गेल्यानंतर राज्यपालांनी अभिभाषण सुरू ठेवले.
आज उपसभापती निवड
शुक्रवारी विधानसभेत उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. सत्ताधारी आघाडीतर्फे भाजपतर्फे कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि काँग्रेसतर्फे काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी विधिमंडळ खात्याच्या सचिवांना सादर केले. सत्ताधारी आघाडीचे आमदार लोबो विजयी होतील. शुक्रवारी अधिकृतरीत्या त्याबाबतची घोषणा होईल. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपसभापती पदाची निवडणूक लढवावी, असे ठरविण्यात आले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Congress closure, governance protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.