काँग्रेस हाउसचे चक्क
By admin | Published: October 14, 2014 01:44 AM2014-10-14T01:44:28+5:302014-10-14T01:44:40+5:30
पणजी : प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर नव्या नेतृत्वाला काँग्रेसची धुरा सांभाळण्यात कसलीच आडकाठी येऊ नये, या उद्देशाने पणजीतील काँग्रेस हाउसचे होमहवनाद्वारे सोमवारी
पणजी : प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर नव्या नेतृत्वाला काँग्रेसची धुरा सांभाळण्यात कसलीच आडकाठी येऊ नये, या उद्देशाने पणजीतील काँग्रेस हाउसचे होमहवनाद्वारे सोमवारी चक्क शुद्धीकरण करण्यात आले. त्यानंतर ख्रिस्ती धर्मगुरूंनीही धार्मिक विधी करून शुभकार्याची कामना केली. दरम्यान, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो सात वर्षांनंतर सोमवारी काँग्रेस हाउसची पायरी चढले. ते उद्या, मंगळवारी पदाची सूत्रे हाती घेत असून जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
२००७च्या विधानसभा निवडणुकीत फालेरो यांचा नावेली मतदारसंघात पराभव झाला होता. त्यानंतर ते काँग्रेस हाउसमध्ये कधीच आले नव्हते. ते अखिल भारतीय स्तरावर पक्षाचे काम करू लागल्यानंतर त्यांना काँग्रेस हाउसमध्ये कधी यावेही लागले नव्हते. आता त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या समर्थकांनी येथील काँग्रेस हाउसच्या दारावरील काही भागाचे रंगकाम केले आहे. काँग्रेस हाउसची सोमवारी पूर्णपणे सफाई करण्यात आली. जॉन फर्नांडिस प्रदेशाध्यक्षांसाठीच्या ज्या केबिनमध्ये बसत होते, तिथे होम केला गेला. पुरोहित येऊन गेल्यानंतर दोघा ख्रिस्ती धर्मगुरूंना आणण्यात आले व त्यांच्यामार्फतही धार्मिक सोपस्कार पार पाडले गेले. काँग्रेस हाउसचे शुद्धीकरण केले गेले, याची चर्चा पक्षात सुरू आहे.
फालेरो काँग्रेस हाउसमध्ये आले तेव्हा एम. के. शेख, मोती देसाई, विजय पै, संकल्प आमोणकर वगैरे उपस्थित होते. आमदार पांडुरंग मडकईकर, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व कळंगुटचे जोसेफ सिक्वेरा हेही सोमवारी काँग्रेस हाउसमध्ये येऊन फालेरो यांना भेटून गेले. मडकईकरही दोन वर्षांनी काँग्रेस हाउसमध्ये पोहचले.
दरम्यान, फालेरो मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने प्रत्येक मतदारसंघातून काँग्रेस समर्थकांना आणण्यास सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी माणसे घेऊन येण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. फालेरो हे मंगळवारी महालक्ष्मी मंदिरात जातील व पणजीच्या चर्चमध्येही जाऊन येणार आहेत. सकाळी ९ ते १० या वेळेत त्यांचा सूत्रे स्वीकारण्याचा कार्यक्रम होणार आहे. फालेरो यांनी एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे गेले वर्षभर गप्प राहिलेले
काही आमदार आणि अनेक इच्छुक उमेदवार माणसे जमविण्याच्या कामास लागले आहेत. (खास प्रतिनिधी)