खाण खात्यावर कॉंग्रेसचा मोर्चा, थकीत १६५ कोटी रुपये वसूल करण्याची मागणी
By पूजा प्रभूगावकर | Published: February 23, 2024 04:33 PM2024-02-23T16:33:37+5:302024-02-23T16:33:44+5:30
त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न यावेळी कॉंग्रेसने खाण खात्याला केला.
पणजी: वेदांता कंपनीकडून खाण व्यवसायाचे थकीत १६५ कोटी रुपये सरकारने अगोदर वसूल करावे, अन्यथा वेदांताचे खनिज माल वाहतूकीसाठी आलेले जहाज जप्त करावे अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसने करीत खाण खात्यावर धडक मोर्चा नेला.
थकीत रक्कम दिल्याशिवाय वेदांता कंपनीला जहाज मधून खनिज मालाची निर्यात करण्यास खाण खात्याने कशी परवानगी दिली, त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न यावेळी कॉंग्रेसने खाण खात्याला केला.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पणजी येथील खाण खात्याच्या कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा नेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. तत्पूर्वी पोलिसांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला वाटेवर अडवण्यात आल्याने त्यांच्याच काहींशी बाचाबाचीही झाली. सरकार जर ही थकीत रक्कम वसूल करीत नाही, तर वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा यावेळी त्यांनी दिला.