काँग्रेसची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरुद्ध गोव्यात निवडणूक आयोगाकडे तक्रार
By किशोर कुबल | Published: April 26, 2024 02:37 PM2024-04-26T14:37:46+5:302024-04-26T14:40:01+5:30
उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्या विधानावरुन चुकीची माहिती पसरवल्याचा दावा
किशोर कुबल/पणजी
पणजी : इंडिया आघाडीचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्या विधानाचा विपर्यास करुन चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करीत प्रदेश कॉग्रेसने मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतरांविरोधात तक्रार सादर करुन कारवाईची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर आणि पदाधिकाय्रांनी तीन पानी लेखी तक्रार सादर केली आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की, दक्षिण गोवा काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरयातो फर्नांडिस हे कारगिल युद्धात सेवा करणारे युद्धवीर आहेत. त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. विरियातो यांनी कोणत्याही प्रकारे भारताच्या राज्यघटनेचा अनादर केलेला नाही.’
तक्रारीत पाटकर पुढे म्हणतात की, ‘पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडमधील त्यांच्या भाषणात वीरियातो यांच्या भाषणाची चुकीची माहिती पसरवून आरोप केले. मोदी यांच्याबरोबरच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर आणि भाजप प्रवक्ते दामोदर नाईक यांच्यावर आम्ही कडक कारवाईची मागणी करतो.’