काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा : नाईक
By admin | Published: April 21, 2015 01:39 AM2015-04-21T01:39:32+5:302015-04-21T01:39:47+5:30
मडगाव : काँग्रेस पक्षाच्या चार माजी मुख्यमंत्र्यांना आता कंठ फुटू लागला असून ते भाजप सरकार सत्तेवर आल्यास तीन वर्षे पूर्ण होऊन देखील
मडगाव : काँग्रेस पक्षाच्या चार माजी मुख्यमंत्र्यांना आता कंठ फुटू लागला असून ते भाजप सरकार सत्तेवर आल्यास तीन वर्षे पूर्ण होऊन देखील कोणतीच विकासकामे करण्यास सरकारला अपयश आल्याचे सांगत सुटले आहेत. परंतु, भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत गोव्यात अनेक विकासकामे केली आहेत. काँग्रेस पक्षाने येत्या निवडणुकीपूर्वी आपला मुख्यमंत्री कोण ते जाहीर करावे, असे आव्हान भाजप प्रवक्ते दामोदर नाईक यांनी दिले आहे.
मडगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दामोदर नाईक म्हणाले, भाजप सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जी आश्वासने जाहीरनाम्यात दिली होती त्यातील ७० ते ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. भाजपने गेल्या तीन वर्षांत कालवी पूल पूर्ण केला आहे. सध्या मांडवी नदीवरील नव्या पुलाचे काम सुरू आहे. पणजी येथे १०० कोटी खर्चून पार्किंग प्लाझा बांधण्यात आला असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. अनेक ठिकाणी चारपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. खांडेपार पुलाची पायाभरणी करण्यात आली आहे.
ओल्ड गोवा रस्त्याचे रुंदीकरण, लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत युवतींना लाभ, गृह आधार व दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थींच्या खात्यात दरमहा रक्कम जमा केली जात आहे. विरोधक केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच काँगे्रस पक्षाने येत्या विधानसभा निवडणुकीत आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहे. (प्रतिनिधी)