CoronaVirus News: ...हे तर सरकारच्या बेजबाबदार कारभाराचं ज्वलंत उदाहरण; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 04:12 PM2020-10-12T16:12:22+5:302020-10-12T16:12:40+5:30
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डिडिएसवाय योजना रद्द करणे म्हणजे श्रीमंताकडे लक्ष व गरीबांकडे दुर्लक्ष; गिरीश चोडणकर यांची टीका
पणजी - कोविड आजाराचा उपचार डिडीएसवायच्या खाली आणण्याचा सरकारी निर्णय आज भाजप सरकारने रद्द करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे भाजपच्या केवळ श्रीमंतांकडे लक्ष देण्याच्या व गरीबांकडे दुर्लक्ष करण्याच्या तसेच मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत सरकारच्या बेकारभाराचे ज्वलंत उदाहरण आहे अशी खरमरीत टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
सरकारने त्वरीत सामान्य लोकांच्या कोविड उपचारासाठी योजना जाहीर करावी तसेच खासगी इस्पितळात आकारण्यात येणारे उपचारांचे दर कमी करावेत अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
आजाराचा बाजार करणाऱ्या भाजप सरकारने आज सामान्य माणसाला आर्थीक बोज्याखाली चिरडले असुन, आवश्यक आरोग्य सुविधा निर्माण करण्यास सरकारला आलेल्या अपयशाने आज गरीब कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. दीनदयाळ स्वास्थ्य योजना अचानक रद्द करण्याचा सरकारच्या निर्णयांने डाॅ. प्रमोद सावंत व विश्वजीत राणे यांच्या मधला वाद परत एकदा उघड झाला आहे असा दावा चोडणकर यांनी केला.
मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या मध्ये खासगी इस्पितळांकडुन येणारे कमिशन वाटुन घेण्याच्या मुद्द्यावर वाद उफाळुन आल्यानेच सरकारने हि योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह मंत्रीमडळातील सर्व मंत्री व भाजपचे पदाधिकारी कोविड महामारी काळात केवळ सरकारी तिजोरी लुटण्यात व्यस्त आहेत हा काॅंग्रेस पक्षाचा आरोप आजच्या निर्णयाने परत एकदा खरा ठरला आहे. भाजप सरकारला लोकांच्या आरोग्याचे काहीच पडलेले नाही हे स्पष्ट झाले आहे.
गोव्यात कोविडचे रुग्ण सापडल्यानंतर चाचणी केंद्र सुरू करणे, वैद्यकीय उपकरणे व व्हेंटीलेटर खरेदी या सर्वांसाठी मागील सात महिन्यात जो विलंब झाला तो मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या कमिशन वाटून घेण्यात एकमत नसल्यामुळेच हे आम्ही परत एकदा सांगतो असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.