भावना दुखविणारे खुळे; संवेदनशील विषयांना नखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 08:06 AM2024-05-24T08:06:48+5:302024-05-24T08:08:58+5:30

गेल्या आठ दिवसांत जनतेमधून याबाबत उठाव झाला.

consequences of controversial post on social media on lairai devi rituals | भावना दुखविणारे खुळे; संवेदनशील विषयांना नखे

भावना दुखविणारे खुळे; संवेदनशील विषयांना नखे

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र झाले आहे. कुणीही हातात स्मार्ट फोन घेतो आणि ऊठसूट अत्यंत आक्षेपार्ह भाषेत इतर धर्माच्या व्यक्तीविषयी बोलतो. कुणी पुजाऱ्यांना दोष देतो, कुणी देव-देवतांना, तर कुणी मंदिरे व चर्च यांच्याभोवती वाद उभे करतात. आपण काय बोलतो, कोणत्या विषयावर व्हिडीओ काढतो, आपण किती संवेदनशील विषयाला नख लावतो आहोत, याचे भान अनेकांना अलीकडे राहिलेले नाही. काहीजण यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पकडले गेले आहेत. अशा आक्षेपार्ह विधानांकडे समाजही काहीवेळा दुर्लक्ष करतो. मात्र अलीकडे हे संताप आणणारे खुळचट प्रकार वाढले आहेत. विशेषतः हिंदू समाजबांधवांना गृहीत धरून त्यांच्या श्रद्धास्थानांविषयी वाट्टेल त्या प्रकारचे व्हिडीओ काढून व्हायरल करण्याचे खूळ काहीजणांच्या डोक्यात घुसले आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्याची, लढण्याची गरज होतीच. गेल्या आठ दिवसांत जनतेमधून याबाबत उठाव झाला.

श्रद्धा व अंधश्रद्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; मात्र अतिरेकी व अविवेकी भाषा वापरून कुणाच्या धार्मिक व जातीय भावना दुखविण्याचा अधिकार कुणालाच नाही. वाद जमिनीचा असेल तर तो न्यायालयात योग्य ते पुरावे सादर करून सोडवायला हवा. न्याय मागण्यासाठी विविध व्यासपीठे आहेत; मात्र जमिनीचा विषय किंवा मालकीचा प्रश्न राहिला बाजूला, त्याऐवजी देवतांना, भक्तांना व धोंडांना अकारण दोष देऊन, आक्षेपार्ह शब्द वापरून आपणच आपल्या अकलेचे दिवाळे काढत आहोत, याचे भान अशा लोकांना राहिलेले नाही. प्रत्येक वादाला व विषयाला दुसरी बाजूदेखील असते. ती समजून न घेता थेट धार्मिक भावनांवर हल्ले करून जगावेगळे प्रश्न विचारणारे काही घटक गोव्यात विविध तालुक्यांमध्ये आहेत. 

कधी परशुरामाविषयी वाद निर्माण करणारेही येथे पाहायला मिळाले. दुसऱ्याच्या प्रार्थनास्थळाविषयी गैरउद्‌गार काढून किंवा दुसऱ्याची श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे, असे दाखविण्याच्या नादात काहीजण खूप वाहवत जातात. काही अतिरेकी व अविवेकी व्यक्तींमुळे मूळ चळवळींचीदेखील हानी होते. उदाहरणार्थ काहीजण खरोखरच बुरसट व खुळचट प्रथांविरुद्ध प्रामाणिकपणे लढत असतील तर त्यात भलतेच वेडगळ लोक घुसतात आणि हिंदूच्या श्रद्धास्थानांवर हल्ले करून धार्मिक भावना दुखवतात. यातून मग मूळ चळवळीचा हेतूच नष्ट होतो. अर्थात कुंकळ्ळी किंवा डिचोलीत जो विषय झाला, तो थोडा वेगळा आहे. तिथे तर भक्तांना किंवा देवीला किंवा मंदिराला दोष देण्याचे कारणच नव्हते. 

समजा एखाद्याला जमिनीच्या मालकीविषयी शंका किंवा तक्रार असती तर न्यायालयात धाव घेता आली असती, लोकांच्या आडनावांवरून किंवा भक्तांच्या हेतू व श्रद्धांवरून वाद निर्माण करण्याचे किंवा अपशब्द वापरण्याचे कारणच नव्हते. सर्वच लोकांना किंवा महाजनांना अकारण दुखवण्याचे काम संबंधितांनी व्हिडीओ काढून केले आहे. एक-दोघांना पोलिसांनी अटकही केली.

गोवा मुक्ती लढ्यात कुंकळ्ळीच्या लोकांचे योगदान खूपच मोठे आहे. पोर्तुगीज राजवटीविरुद्ध तेथील भूमिपुत्रांनी दिलेला लढा सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. ज्या काळात पोर्तुगीजांमधील काही घटक खूप अत्याचार करत होते, त्या काळात आपले देव-देवता, मंदिरे, धर्म या गोष्टी जपून ठेवण्यासाठी लढणे हे खूप शौर्याचे होते. गोव्यातील काहीजणांना ते जमले नाही. काहीजण तटस्थ राहिले, तर काहीजण शरण गेले. काहीजणांनी परराज्यात जाऊन राहणे पसंत केले. 

पोर्तुगीज काळात हिंदू मंदिरे किंवा मराठी शाळा जपण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी जुन्या काळातील एका पिढीने खूप हालअपेष्टा सोसल्या आहेत, याची कल्पना नव्या पिढीला नसेल. देवी-दैवतांवरील श्रद्धेतूनच गोमंतकीय भूमिपुत्रांना व कुंकळ्ळीच्या लोकांना शौर्याची प्रेरणा व वारसा मिळाला, असे एका मर्यादित अर्थाने म्हणता येईल. लोकांच्या आडनावांविषयी वगैरे प्रश्न उपस्थित करून आपण कोणता पराक्रम करीत आहोत, याचा विचार संबंधितांनी करायला हवा. कुंकळ्ळीचा विषय घेऊन काहीजणांनी शिरगावच्या लईराई देवीच्या धोंडांबाबतही चुकीची भाषा वापरली. धोंडांचे चुकीचे वर्णन केले. त्यामुळेही लोक खवळले आणि डिचोलीतील नागरिकांनी पोलिस स्थानकावर धडक दिली. लोकांना रस्त्यावर उतरावे लागले. धार्मिक छेड काढणाऱ्यांनी धडा घ्यायला हवा.

Web Title: consequences of controversial post on social media on lairai devi rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा