विभाजनाचे षडयंत्र हाणून पाडू, देश प्रथम हे भारताचे तत्त्व: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 09:13 AM2023-11-01T09:13:39+5:302023-11-01T09:32:12+5:30
साखळीत एकता दौडला प्रतिसाद.
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : विविधतेतून एकता जपणाऱ्या सर्वधर्म समभाव मानून एकसंध असलेल्या भारत देशात काही असंतुष्ट आत्मे देश विघटन करण्याचे षडयंत्र करीत आहेत. तुकडे तुकडे गँगचा नायनाट करून सर्व देश बांधवांनी एकतेचा संदेश देत मजबूत भारत, विकसित भारत व विश्वगुरू भारताचे स्वप्न साकारण्यासाठी एकसंध राहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
राष्ट्रीय एकतादिनानिमित्त साखळी येथे आयोजित केलेल्या एकता दौड कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वांना एकतेची शपथ दिली. देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व राज्यांना, प्रदेशांना एकत्र आणण्याचे काम केले.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवा, ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी एकता दौडचा प्रारंभ केला. तसेच त्यांनी पूर्ण सहभाग दिला. यावेळी नगराध्यक्ष रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, सिद्धी पोरोब दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, राया पार्सेकर इतर सर्व नगरसेवक, भाजपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित मार्गदर्शन करणारी भाषणे झाली.
नवभारताचे स्वप्न साकारूया....
एकेकाळी काश्मीर हा देशात असूनही वेगळा प्रदेश मानला जात असे. २०१३ साली दोन लाख युवकांनी त्याठिकाणी जाऊन तिरंगा फडकावला. त्यात आपलाही सहभाग होता, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकारताना ३७० कलम रद्द केले. तसेच अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. देशाचे विघटन करू पाहणाऱ्या तुकडे गँगचा नायनाट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. युवा पिढीने भारत एकसंध ठेवण्याची शपथ घेताना आपले योगदान द्यावे व नवभारताचे स्वप्न साकार करावे, तसेच पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करूया, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.