हवालदाराला भोवले वाईन शॉप गुगल पे प्रकरण, सेवेतून निलंबित
By सूरज.नाईकपवार | Published: July 12, 2023 06:10 PM2023-07-12T18:10:24+5:302023-07-12T18:11:04+5:30
या प्रकरणात एक होमगार्डही गुंतला आहे. त्याच्यावर कारवाई संबंधी होमगार्ड कमांडरकडे पत्रव्यवहार केला आहे, असे ते म्हणाले.
सूरज नाईक पवार / मडगाव
मडगाव : वाईन शाॅपमध्ये जा व दंडाची रक्कम गुगल पे कर असे सांगणारा गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा पोलिस ठाण्यातील हवालदार प्रशांत वेळीप याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वाहतूक नियमाचा भंग केल्याप्रकरणात वेळीप याने एका चालकाला दंड भरण्यास सांगितला होता. संबंधित वाईन शाॅपमध्ये जा व तेथे दंडाची रक्कम भर, असे सांगितले होते. त्यानुसार त्या वाहनचालकाने गुगल पे केले. मात्र त्याला त्याची पोचपावती दिली नव्हती. या घटनेचा गाजावाजा झाल्यानंतर पाेलिसांना हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे लागले. शेवटी वेळीप याला निलंबित केले गेले. मडगाव पोलिस विभागाचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वेळीप याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात एक होमगार्डही गुंतला आहे. त्याच्यावर कारवाई संबंधी होमगार्ड कमांडरकडे पत्रव्यवहार केला आहे, असे ते म्हणाले.
प्रशांत वेळीप याला लवकरच बढती मिळणार होती. तो सहायक पोलिस उपनिरीक्षक बनणार होता. आता निलंबित झाल्याने त्याला या पदापासून सध्या तरी वंचित राहावे लागणार आहे. जुलै महिन्यात काही पोलिसांची वेतनवाढ होत आहे. वेळीप याचीही वेतनवाढ होणार होती. ज्या दुचाकी चालकाला पोलिसांनी तालाव दिला व वाईन शॉपमधील गुगल पे वर जीपे करण्यास सांगितले. त्याला भरलेल्या रकमेची दंडाची पावतीही देण्यात आली नव्हती. त्या वाहनचालकाच्या वडिलांनी याप्रकरणी त्या वाईन शॉपमालकाशी संपर्क साधून दिलेल्या पैशाबाबत चौकशीही केली होती. घडलेल्या घटनेच्या दिवशी कोलवा पोलिस ठाण्यावर अन्य एक उपनिरीक्षक होता. वाहतूक नियमभंगाच्या तक्रारी नोंद करण्यासाठी त्यांना जे मशीन दिले जाते, त्यावर संबंधित अधिकाऱ्याचा आयडी नंबर नोंद करावा लागतो. मात्र वेळीप याने अन्य एका पोलिस उपनिरीक्षकाचा आयडी नंबर नोंद केला होता, अशीही माहितीही मिळाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारात काहीतरी कोळेबेरे असल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे.
दरम्यान कोलवा पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरोन डिकॉस्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आम्ही त्या वाईन शाॅप मालकाला बोलावून त्याची जबानी घेतल्याचे सांगितले.