म्हापशातील मोकाट गुरांसाठी कुचेलीत कोंडवाडा बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 10:11 PM2019-07-19T22:11:55+5:302019-07-19T22:12:42+5:30
पालिकेच्या बैठकीत सर्वांनुमते ठराव मंजूर
म्हापास : पालिका क्षेत्रातील गुरांसाठी एक कोंडवाडा उभारण्याचा म्हापसा पालिकेने आज झालेल्या खास बैठकीत घेतला. हा कोंडवाडा पालिकेच्या मालकी हक्काची जागा असलेल्या कुचेली परिसरात बांधला जाईल. तसेच शहरातील बेवारस वाहनांसाठी सुद्धा याच ठिकाणी जागा नेमून या गाड्या येथे आणून ठेवल्या जातील, असा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला.
सुमारे चार हजारपेक्षा जास्त चौरस मीटर जागेत हा कोंडवाडा उभारला जाईल. या कामाची प्रक्रिया सुरू झाली असून त्यानुसार जाग्याला चार बाजुंनी संरक्षक भींत उभारली जाईल. त्याचप्रमाणे याच ठिकाणी सुमारे दोन हजार चौरस मीटर जागेत वाहतूक खात्याच्या शिफारसीनुसार त्यांना शहरातील बेवारस पडलेल्या वाहनांना ठेवण्यासाठी जागा दिली जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी यावेळी दिली.
शहरात अंदाजे १८० मोकाट गुरे आहेत, असे पालिकेकडून झालेल्या पाहणीअंती स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पालिकेने आज खास बैठक बोलावून यावर तोडगा काढण्यासाठी ठराव मंजूर करून घेतला. सुरूवातीला पालिकेने एखाद्या बिगर सरकारी संस्था किंवा गोसुरक्षाकडे या गुरांची जबाबदारी सोपवून या कोंडची देखरेख करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सरकारकडून अपेक्षित आर्थिक मदत न मिळाल्याने हा प्रस्ताव बारगळला, अशी माहिती नगराध्यक्ष बाग्रांझा यांनी बैठकीत दिली.
नगरसेवक अजितसिंह राणे यांनी या कोंडवाड्यात सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून काही उपाययोजना पालिकेने उचलले आहे का? असा प्रश्न केला असता नगराध्यांनी सांगितले की, या कोंड्यावाड्याला मुख्य प्रवेशद्वार असेल व तिथे एक सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाईल. शिवाय लहानसे कार्यालय देखील उभारले जाईल, अशी माहिती त्यांनी पुरविली.
मार्केटमधील मास विक्रेतदारांना सध्या पालिकेने तात्पुरत्या दुकानांची व्यवस्था करून दिली आहे. मात्र, या दुकानांची दुरवस्था झाल्याने या विक्रेतदारांना नवीन प्रकल्प बांधून देण्याचे पालिकेने ठरविले आहे. त्यानुसार ८६ लाख १८ हजार ३४९ रुपये खर्चुन हा प्रकल्प उभारला जाईल. हे बांधकाम तळमजल्यापुरती मर्यादित असेल यात १२ दुकानांचा सहभाग आहे.