विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी

By admin | Published: March 3, 2015 01:25 AM2015-03-03T01:25:39+5:302015-03-03T01:30:24+5:30

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकांना आता विधानसभा निवडणुकीच्या सेमी-फायनलचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Constructive frontline for assembly | विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी

विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी

Next

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकांना आता विधानसभा निवडणुकीच्या सेमी-फायनलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आपापल्या पसंतीच्या कार्यकर्त्यांना जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी मंत्री आणि आमदारांचे एकमेकांविरुद्ध शह-काटशहाचे राजकारण सध्या रंगात येत आहे. एकप्रकारे विधानसभेची रंगीत तालिम करताना
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आडून मतदारसंघातील वजन तोलण्याची सुप्त खेळी आमदार-मंत्र्यांकडून खेळली जात आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी एकूण ७ लाख ८० हजार ५१७ व्यक्तींना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. म्हणजेच गोव्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत ८० टक्के मतदार जिल्हा पंचायतीसाठी मतदान करणार आहेत. आता कोणता मंत्री किंवा आमदार किती उमेदवारांना निवडून आणेल, त्यावर संबंधित मंत्री-आमदाराच्या विधानसभा मतदारसंघातील समीकरणे ठरणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर होत असल्या, तरी पक्षापेक्षाही मंत्री-आमदारांच्याच व्यक्तिगत स्तरावर या निवडणुका होत असल्यासारखे चित्र दिसून येत आहे. जिल्हा पंचायत मतदारसंघांची रचना बदलली गेली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बरीच
बदलली आहेत.
काँग्रेस पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात थेटपणे उतरलेला नाही. मात्र, काँग्रेसच्या आमदारांनी तसेच काही पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या पसंतीचे उमेदवार रिंगणात उतरविणे सुरू केले आहे. काँग्रेसचे आमदार पांडुरंग मडकईकर, बाबूश मोन्सेरात, विश्वजित राणे, बाबू कवळेकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी आपले उमेदवार निवडले आहेत. मगो पक्षानेही उमेदवार निवडले आहेत. उसगाव-गांजे येथे कोणता उमेदवार उभा करावा, याविषयी मात्र मगोत बराच खल झाला. भारतीय जनता पक्ष उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत आघाडीवर आहे. भाजपने आपल्या मंत्री व आमदारांच्या पसंतीचेच उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. तरीही काही मतदारसंघात उमेदवार निवडण्याबाबत भाजप नेत्यांना बराच मनस्ताप झाला.
दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Constructive frontline for assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.