कर्नाटकविरुद्ध लवादासमोर अवमान याचिका शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 07:19 PM2018-07-24T19:19:01+5:302018-07-24T19:19:20+5:30
कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविल्याने कर्नाटकविरुद्ध दिल्लीत पाणी तंटा लवादासमोर अवमान याचिका सादर करावी लागेल, असा विचार सरकारने चालविला आहे.
पणजी - कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविल्याने कर्नाटकविरुद्ध दिल्लीत पाणी तंटा लवादासमोर अवमान याचिका सादर करावी लागेल, असा विचार सरकारने चालविला आहे. जलसंसाधन खात्याच्या अभियंत्यांचे पथक म्हादईच्या खो:याला सोमवारी भेट देऊन आले. कर्नाटकने पाणी वळविल्याचे त्यावेळी दिसून आले. अजून गोवा सरकारने पाणी तंटा लवादासमोर अवमानयाचिका सादर केलेली नाही पण अवमान याचिका सादर केली जाईल, असे जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर यांचे म्हणणे आहे.
म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविले गेल्याने उद्या-परवा अवमान याचिका सादर केली जाईल, असे मंत्री पालयेकर म्हणाले. मात्र लोकमतने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांना मंगळवारी विचारले असता, अवमान याचिका सादर करण्याची सूचना आपल्याला अजून कुणाकडूनच आलेली नाही असे त्यांनी सांगितले. कर्नाटकने जर कायदेभंग केला असेल तर निश्चितच अवमान याचिका सादर करावी लागेल. कर्नाटक पाणी वळवू शकत नाही. त्यांनी लवादाच्या सूचनांचा भंग केला असेल तर लगेच अवमान याचिका सादर व्हायला हवी, असे नाडकर्णी म्हणाले.
दरम्यान, म्हादई पाणी तंटा लवाद आपला अंतिम निकाल येत्या महिन्यात देण्याची शक्यता आहे. गोवा व कर्नाटक दरम्यान असलेल्या म्हादई पाणीतंटाप्रश्नी लवादासमोर बराच काळ सुनावणी झालेली आहे. गोव्याची बाजू भक्कम असल्याचे कायदा तज्ज्ञांचे म्हणणो आहे. मात्र कर्नाटकने कसलीच पर्वा न करता म्हादई नदीचे पाणी वळविले आहे. जलसंसाधन खाते याविषयी पूर्ण गाफीलच होते. पर्यावरणप्रेमींच्या सतर्कतेमुळे पाणी वळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असे सुत्रंनी सांगितले. कर्नाटकशी पाणी वाटपाविषयी चर्चा करता येईल, असे कर्नाटक निवडणुकीच्या काळात गोवा सरकारने जाहीर केले होते.