गोव्यातील मातब्बर राजकारण्यांमागे आजारपणांचं शुक्लकाष्ट सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:25 AM2018-06-18T11:25:21+5:302018-06-18T11:25:21+5:30
गोव्यातील मातब्बर राजकीय नेते, मंत्री, आमदार आजारी पडणे व मग त्यांना इस्पितळात दाखल करणे हे गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे.
पणजी : गोव्यातील मातब्बर राजकीय नेते, मंत्री, आमदार आजारी पडणे व मग त्यांना इस्पितळात दाखल करणे हे गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे. नेते आजारी पडले की, लगेच त्यांचे मोठ्या संख्येने समर्थक मंदिरांमध्ये प्रार्थना करतानाही दिसून येत आहेत. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रतापसिंग राणे आणि गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांची प्रकृती आता सुधारली आहे.
80 व 90 च्या दशकात गोव्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेले राणे यांना दोन दिवसांपूर्वीच अस्वस्थ वाटू लागले. त्यांना रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळ इस्पितळात आणण्यात आले. तिथे त्यांना दाखल करून विविध वैद्यकीय चाचणी करण्यात आल्या. राणे यांना मूत्रसंसर्ग झाला होता. आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे प्रतापसिंग राणे यांचे पुत्र आहेत. विश्वजित यांनी रविवारी रात्री गोमेकॉ इस्पितळाला भेट दिली. आपले वडील राणे यांची प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली दोन दिवस ठेवले गेले. आज दुपारी त्यांना गोमेकॉ इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे मंत्री विश्वजित यांनी सोमवारी सकाळी लोकमतला सांगितले.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे नुकतेच स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेऊन गोव्यात परतले आहेत. पर्रीकर यांची प्रकृती सुधारली आहे. ते सार्वजनिक सोहळ्यांची निमंत्रणं तूर्त स्वीकारणार नाहीत. आपल्यावरील उपचार सुरूच राहतील. आपण दिवसाला सहा ते सात तास शासकीय काम करीन, असे मुख्यमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत नुकतेच सांगितले. तुम्ही जास्त ताण घेऊ नका, असा सल्ला काही मंत्र्यांनीही पर्रीकर यांना दिला आहे.
गोव्याचे वीज मंत्री पांडुरंग मडकईकर हे गेले दहा दिवस मुंबई येथील कोकीळाबेन इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. मंत्री मडकईकर यांची प्रकृती आता सुधारली आहे, ते पूर्वी व्हेंटीलेटरवर होते पण आता व्हेंटीलेटरवर नाहीत. ते अतिदक्षता विभागात आहेत. ते संवादही साधतात, असे त्यांचे बंधू धाकू मडकईकर यांनी लोकमतला सांगितले. धाकू हे गेले अनेक दिवस मंत्री मडकईकर यांच्यासोबत इस्पितळात होते.
काँग्रेसचे आमदार इजिदोर फर्नाडिस हेही आजारी आहेत. त्यांच्यावर नुकतीच मूत्रपिंडाची मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. भाजपाचे आमदार कालरुस आल्मेदा यांना अडीच महिन्यांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. ते त्या आजारातून बरे झाले आहेत पण अजून ते घरी विश्रंती घेत आहेत. गोव्याचे माजी उपसभापती विष्णू वाघ हे गंभीर आजारातून थोडे सावरले आहेत. ते घरीच असतात. दीड महिन्यापूर्वी गोव्याचे आणखी एक माजी मुख्यमंत्री तथा आमदार रवी नाईक हे दिल्ली दौ-यावर असताना अचानक आजारी पडले व त्यांना तत्काळ दिल्लीतील इस्पितळात दाखल करावे लागले होते. गोव्याचे एक माजी खासदार व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा गेल्या आठवडय़ात अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.