जहाजातून नाफ्ता काढणे सुरूच, जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 08:45 PM2019-12-14T20:45:08+5:302019-12-14T20:45:32+5:30
नाफ्ताप्रश्नी सरकार मोठी लपवाछपवी करत असल्याचा लोकांचा संशय आता बळावू लागला आहे.
पणजी/ वास्को : मुरगाव पोर्ट ट्रस्टने राज्य प्रशासनाला कोणतीही दाद न देता नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता काढून तो सडा येथील गणेश एन्झोप्लासटच्या टाकीत सोडणे सुरूच ठेवले. यामुळे मंत्री मिलिंद नाईक व वास्कोवासियही संतप्त बनताच दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिका-यांनी तातडीने सडा येथे व मग एमपीटीला भेट दिली आणि शेवटी सायंकाळी कारणे दाखवा नोटीस जारी केली. मुख्य सचिव परिमल रे यांनी या विषयात हस्तक्षेप करून नाफ्ता काढणो थांबवावे म्हणून मुख्य सचिवांना मंत्री नाईक यांनी 25 फोन कॉल्स केले पण त्यांच्याकडून थंडा प्रतिसाद लाभला.
जिल्हाधिका-यांनी तत्काळ नाफ्ता शिफ्टींग बंद करणे गरजेचे होते असे लोकांना वाटते पण त्यांनी तसे न करता कारणे दाखवा नोटीस जारी केली. त्यांनी स्टॉप आदेश दिला नाही. कारणे दाखवा नोटीसमध्येही मोठासा दम दिसत नाही. नाफ्ता हाताळण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने गणेश बेन्झोप्लास्टाकडे उपाययोजना किंवा सुविधा नाहीत असे नोटिशीत म्हटले आहे. आपल्या नोटीशीला उद्या रविवारी सकाळी अकरापर्यंत उत्तर द्या, अन्यथा 2005 च्या आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याखाली काम बंदचा आदेश द्यावा लागेल असे जिल्हाधिका-यांनी बजावले आहे.
नाफ्ताप्रश्नी सरकार मोठी लपवाछपवी करत असल्याचा लोकांचा संशय आता बळावू लागला आहे. मुख्यमंत्री किंवा जिल्हाधिकारी जे काही बोलतात, त्याचा मुरगाव पोर्ट ट्रस्टवर काहीही परिणाम होत नाही असे दिसून येते. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला काम करावे लागते अशी भूमिका एमपीटीने घेतल्याचे काही सरकारी अधिकारी म्हणतात.
मुख्य सचिवांनी मला ते आजारी असल्याचे शेवटच्या कॉलवेळी कळवले. मी पंचवीस कॉल्स केले. ते जर आजारी आहेत तर त्यांनी मला अगोदरच तसे कळविता आले असते.
- मंत्री मिलिंद नाईक