तेरेखोल येथे गोल्फ कोर्सचे काम चालूच

By admin | Published: May 19, 2015 01:29 AM2015-05-19T01:29:42+5:302015-05-19T01:29:51+5:30

पेडणे : केरी पंचायत क्षेत्रातील तेरेखोल गावातील दिल्ली येथील मेसर्स लिडिंग हॉटेल प्रा. लि. मिरेड कंपनीने जागा घेऊन गोल्फ कोर्स प्रकल्पाचे

Continuing work on golf courses at Terekhol | तेरेखोल येथे गोल्फ कोर्सचे काम चालूच

तेरेखोल येथे गोल्फ कोर्सचे काम चालूच

Next

पेडणे : केरी पंचायत क्षेत्रातील तेरेखोल गावातील दिल्ली येथील मेसर्स लिडिंग हॉटेल प्रा. लि. मिरेड कंपनीने जागा घेऊन गोल्फ कोर्स प्रकल्पाचे काम प्राथमिक पातळीवर सुरू केले आहे.
प्रकल्पाच्या कामाला अडथळा करत ग्रामस्थ व अ‍ॅड. अ‍ॅन्थनी कूळ-मुंडकार संघटनेने पेडणे पोलिसात बेकायदा रस्ता व झाडे कापल्याची तक्रार दिली. मात्र, कोणतीही तक्रार अथवा गुन्हा पेडणे पोलिसांनी नोंदवला नाही. लिडिंग हॉटेल कंपनीने संपूर्ण तेरेखोल गावातील साडेबारा लाख चौरस मीटर जागा मूळ मालक (खलप) यांच्याकडून विकत घेतलेली आहे. काही जमिनीत कूळ-मुंडकार नोंदणी आहेत. कुळाच्या जमिनी सहजासहजी विकत घेता येत नाहीत. मात्र, काही कुळांनी यापूर्वी मामलेदार कार्यालयात न्यायालयात अर्ज करून आपली १/१४ उताऱ्यावर चुकून कुळाची नावे लागली, त्यामुळे आपले कूळ नाव रद्द करावे, यासाठी अर्ज केले, त्यामागे वेगळी कारणे आहेत.
लिडिंग हॉटेल कंपनीने १५ मे रोजी गोल्फ कोर्स प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यासाठी पूर्वी केलेला रस्ता खोदण्याचे काम झाडेझुडपे व अडथळे दूर करून मोठी जेसीपी यंत्रणा प्रकल्पस्थळी आणली जात होती. त्याचा सुगावा ग्रामस्थ व काही कूळ मालकांना लागला. ज्यांचा या प्रकल्पाला नव्हे, तर कुळाच्या जमिनी द्यायला विरोध आहे त्यांनी एकत्रित येऊन कामात अडथळा निर्माण केला. त्यानुसार तेरेखोल कूळ-मुंडकार संघटना व काही ग्रामस्थांनी बेकायदा रस्ता व झाडे कापल्याची तक्रार पेडणे पोलीस स्टेशन, वन खाते, पेडणे मामलेदार यांना दिली होती. यासंदर्भात पेडणे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्याकडे संपर्क साधला असता अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा नोंद केलेला नाही किंवा तक्रार नोंदवलेली नाही. तक्रारीसंबंधी तपास व प्राथमिक चौकशी चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीबरोबर चर्चा चालू
ज्यांच्या कुळाच्या जमिनी कंपनीने घेतलेल्या आहेत, त्या कुळाच्या संबंधित व हॉटेल लिडिंग कंपनीचे यास जबाबदार अधिकारी माहोतो यांच्याकडे चर्चा कुळांनी सुरू केली असून काही कूळ मालकांनी आपल्या मागण्या कंपनीकडे लेखी स्वरूपात सादर केलेल्या आहेत. त्यात एकूण २ लाख ९० हजार चौरस मीटर कुळाची जागा कंपनीने परत करावी, ही जमीन १२ कुटुंबांची आहे, असे म्हटले आहे.
कुळांना हक्क मिळावा यासाठी धडपडणारे युवा वकील अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर यांच्याकडे संपर्क साधला असता कंपनीला कुळांच्या मागण्या लेखी स्वरूपात सादर केलेल्या आहेत. त्या मागण्या मान्य होतील, असा विश्वास व्यक्त होऊन दोन वेळा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा यशस्वी झाली असून पुढील अंतिम चर्चेत यावर तोडगा निघेल. कंपनीने जे बेकायदा काम चालू केले
त्याविषयी लेखी तक्रारी दिल्याचे अ‍ॅड. शहापूरकर म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Continuing work on golf courses at Terekhol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.