ग्रामीण पत्रकारांचे योगदानही मोलाचे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 12:44 PM2024-07-03T12:44:24+5:302024-07-03T12:45:03+5:30
गोवा ग्रामीण पत्रकार संघाचे साखळीत उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : राज्यातील पत्रकारिता क्षेत्रात ग्रामीण भागातील पत्रकार मोलाचे योगदान देत आहेत. दररोज निघणाऱ्या वर्तमानपत्रांची शीर्षके जरी शहरातून दिली जात असली, तरी जास्त बातम्या ग्रामीण भागातील असतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
अखिल गोवा पत्रकार संघाच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. साखळी येथील रवींद्र भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार डॉ. दिव्या राणे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, गूज संघटनेचे प्रतिनिधी संदेश प्रभुदेसाई, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत उपस्थित होते.
खरा ग्रामीण पत्रकार कोण याची व्याख्या ठरवावी लागणार आहे. ग्रामीण भागात पूर्णवेळ पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनाच सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. सरकारी किंवा खासगी नोकरी करून अर्धा वेळ पत्रकारिता करणाऱ्या तसेच छंद म्हणून लेखन करणाऱ्या शिक्षक, निवृत्त शिक्षक व इतर कर्मचारी यांना पत्रकारांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
निवडणुकीच्या काळात अनेक हंगामी पत्रकार निर्माण होतात. त्यामुळे खऱ्या प्रामाणिकपणे ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांवर अन्याय होतो. यासाठी सर्वप्रथम हंगामी निर्माण होणाऱ्या पत्रकारांवर बंदी घालणे गरजेचे आहे. गूज व ग्रामीण पत्रकार संघाने विविध भागांत नियुक्त केलेल्या पत्रकारांची यादी मागवून घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. पत्रकारिता माध्यमातून आपल्या सभोवताली घडणाऱ्या चांगल्या घटनांचे वृत्तांकन व्हायला हवे. युवा पिढीला वर्तमानपत्र वाचनाची आवड निर्माण होईल असे लेखन व्हायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पत्रकारांनी तटस्थ व निर्भीड राहून सत्य लिखाण करायला हवे. कुणाच्या दबावाखाली लिखाण करू नये, असे आमदार शेट्ये म्हणाले. राज्याच्या विकासासोबत सामाजिक क्षेत्रात प्रगती होण्यात ग्रामीण पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे आमदार राणे म्हणाल्या. केरी येथील स्वामी विवेकानंद ज्ञान मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन मनोदय फडते, नीतिक्षा गावकर यांनी केले. ग्रामीण पत्रकारांच्या मागण्यांच्या निवेदनाचे विशांत वझे यांनी वाचन केले. आभार बी. डी. मोटे यांनी केले.
मान्यवरांचा गौरव
यावेळी अजित पेंगिणकर, संतोष गावकर, सुनील फातर्फेकर, प्रेमानंद भेंडे, अनुराधा मोघे, दिलीप देसाई, मोहन वेरेकर, नारायण राठवड, आनंद नाईक, प्रकाश तळवणेकर, दयानंद राणे, उमेश बाणास्तरकर यांचा सन्मान झाला.