गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वादाचा भडका; जमावाकडून मंत्र्यावर दगडफेक

By सूरज.नाईकपवार | Published: February 19, 2024 04:06 PM2024-02-19T16:06:34+5:302024-02-19T16:06:56+5:30

रविवारपासून या भागात तणावाचे वातावरण होते. एकंदर स्थिती बघून पोलिसांनी ज्यादा कुमकही बोलावून घेतली होती.

Controversy flares up over statue of Chhatrapati Shivaji Maharaj The crowd threw stones at the minister | गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वादाचा भडका; जमावाकडून मंत्र्यावर दगडफेक

गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वादाचा भडका; जमावाकडून मंत्र्यावर दगडफेक

मडगाव: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या मुद्द्यावरून सोमवारी दक्षिण गोव्यातील सासष्टीतील सां जुझे दि अरियाल येथील पाद्रीभाट येथील वातावरण तापलं होतं. संतप्त जमावाने समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांना लक्ष्य बनवत त्यांच्यावरही दगडफेक केली. यात ते किरकोळ जखमीही झाले. फळदेसाई हे या पुतळ्याचे अनावरण करुन माघारी जात असताना हा प्रसंग घडला. यामुळे घटनास्थळी उपस्थित शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी घटनेचे गांर्भीय बघून वेळीच स्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. दरम्यान, मंत्री फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, सर्वांनी धार्मिक सलोखा सांभाळावा, कुणीही कायदा हातात घेउ नये असे आवाहन केले.

रविवारपासून या भागात तणावाचे वातावरण होते. एकंदर स्थिती बघून पोलिसांनी ज्यादा कुमकही बोलावून घेतली होती. पाद्रीभाट येथील एका खासगी जागेत हा पुतळा बसविण्यात आला आहे. ही जागा मकानदर यांची आहे. ते स्वत: मुस्लिम आहेत. त्यांनी ही जागा अनंत तांडेल यांना दिली आहे. मुख्य रस्त्यापासून ही जागा दूर आहे. टेकडीवजा अशी ही जागा आहे. रविवारी या पुतळ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी त्या खासगी जमिनीत रस्ता तयार करण्याचे काम केले जात असताना, स्थानिकांनी त्याला हरकत घेतली होती. या लोकांनी नंतर हे काम रोखले होते. वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा हेही नंतर घटनास्थळी आले होते. पुतळा बसविण्यास आक्षेप नाही मात्र डोंगर कापणी व बेकायदा मातीचा थराव टाकण्याला आपला आक्षेप असल्याचे त्यांनी सांगितले होते. नंतर घटनास्थळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला गेला होता.

नंतर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर ती जमिन खासगी असल्याचे सिद्ध झाले होते. शिवप्रेमींनी नंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान केला होता. सोमवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी सुमारे दोनशे लोक जमले होते. मडगाव विभागाचे उपदंडाधिकारी सुयश खांडेपारकर हेही घटनास्थळी होते. त्यांनी जमावाला शांतता राखण्याचेही आवाहन केले.

नंतर मंत्री सुभाष फळदेसाई हे पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आले. अनावरण करुन परत जात असताना जमावाने त्यांना घेरले व त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली. आमच्या गावात हा पुतळा नकोच अशी भाषाही जमावाने वापरली. मिरवणुक काढण्यासही देणार नाही असे सांगत रस्ता रोखून धरला. फळदेसाई यांनी त्यांना समजाविताना ही जागा खासगी असून, काही हरकत असल्यास उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊ असेही सांगितले. मात्र जमाव काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याचवेळी पाठीमागून त्यांच्यावर दगडफेकले गेले, नंतर पोलिसांनी कडे करुन त्यांना सुखरुप बाहेर काढले.

दरम्यान, फळदेसाई यांनी आपण या प्रकरणी पोलिसांत तक्रार केलेली नाही. आपल्याला हे प्रकरण चिघळविण्याचे नाही. सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन केले. दगडफेकीनंतर त्यांनी आपल्या घरी जाऊन डॉक्टरकडून उपचार करुन घेतले.

Web Title: Controversy flares up over statue of Chhatrapati Shivaji Maharaj The crowd threw stones at the minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा