कन्व्हेन्शन सेंटर प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 09:15 PM2018-01-03T21:15:54+5:302018-01-03T21:16:06+5:30
दोनापॉल येथे तब्बल २ लाख १0 हजार चौरस मिटर जागेत येऊ घातलेल्या नियोजित कन्व्हेन्शन सेंटर व मनोरंजन संस्थेच्या इमारत प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे.
पणजी : दोनापॉल येथे तब्बल २ लाख १0 हजार चौरस मिटर जागेत येऊ घातलेल्या नियोजित कन्व्हेन्शन सेंटर व मनोरंजन संस्थेच्या इमारत प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे.
सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चाचे हे काम सार्वजनिक-खाजगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर केले जाणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांनी दिली. ते म्हणाले की, महामंडळ नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. लवकरच व्यवहार सल्लागार नेमले जातील आणि मास्टर प्लॅनही निश्चित केला जाईल. या कामासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आलेली असून दर आठवड्याला बैठक होते.
५0 व्या इफ्फीआधी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तोडीचा हा प्रकल्प असून उद्योजकता तसेच रोजगार निर्मितीही होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वेगवगळे प्रकल्प येऊ घातले आहेत. सप्टेंबर २0१९ पर्यंत कन्वेंशन सेंटर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. स्मार्ट सिटी अंतगर्त सेंटर फॉर एक्सलंसही येथे येईल, असे कुंकळ्येंकर यांनी सांगितले.
इफ्फी यापुढे कन्व्हेन्शन सेंटरमध्येच होणार असल्याने तेथे स्क्रीनिंगची सोय असेल. परीक्षकांसाठी विशेष दालने, टेस्ट रुम, चित्रपट महोत्सव संचालनालयासाठी दालन अशा सर्व गोष्टी तेथे असतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात या प्रकल्पावर खर्च करण्यात येणार असल्याने तो महसूल निर्मितीच्या दृष्टिकोनातूनही उपयोगी यावा अशा पध्दतीने बांधणी केली जाईल. इफ्फीसाठी दरवर्षी सहा ते सात हजार प्रतिनिधींची नोंदणी होते. सध्या कला अकादमी, आयनॉक्स व मॅकेनिझ पॅलेस अशा तीन ठिकाणी चित्रपट प्रदर्शित करावे लागतात. कन्वेंशन सेंटर झाल्यानंतर इफ्फीचा सर्व सोहळा एकाच छताखाली होईल.
२ लाख १0 हजार चौरस मिटर जमिनीतील बांधकाम क्षेत्राच्या व्यतिरिक्त असलेली जागा पार्किंग, वीज निर्मिती, घन कचरा व्यवस्थापन यासाठी वापरण्यात येईल.