स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करावे: सुभाष शिरोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2024 08:52 AM2024-03-03T08:52:39+5:302024-03-03T08:52:46+5:30
शिरोडा मतदारसंघात 'स्वच्छ शिरोडा, सुंदर शिरोडा' करण्यासाठी शिरोडा येथील गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : 'सुंदर शिरोडा, स्वच्छ शिरोडा' मतदारसंघ करण्यासाठी शिरोडा मतदारसंघातील चारही पंचायतींच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. चारही पंचायतींच्या पंच व सरपंच यांनी सहकार्य करावे. या मोहिमेला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले आहे.
शिरोडा मतदारसंघात 'स्वच्छ शिरोडा, सुंदर शिरोडा' करण्यासाठी शिरोडा येथील गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी मामलेदार, गटविकास अधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी, शिरोडा पंचायतीच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, बोरी पंचायतीचे सरपंच दुमिंग वाझ, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, बेतोडाचे सरपंच मधू खांडेपारकर, पंचवाडी पंचायतीच्या सरपंच लीना फर्नांडिस, भाजप मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपसरपंच सुनील नाईक यांनी आभार मानले.
यावेळी मंत्री सुभाष सुरडकर यांनी बैठकीत विशेष कार्यक्रम जाहीर केला. यात प्रत्येक पंचायतीत स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यशस्वी पंचायतीला ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. एका वर्षाच्या या कार्यक्रमात दोन महिन्यांत एकदा प्रत्येक वाड्यावर भेट देऊन परीक्षण करण्यात येईल. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सुरु केला आहे. 'सुंदर शिरोडा, स्वच्छ शिरोडा 'करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करू, असे आवाहन करण्यात आले.