राज्यात सहकार पदवी, डिप्लोमा अभ्यासक्रम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:35 AM2023-11-15T07:35:43+5:302023-11-15T07:36:46+5:30

सहकारातून घेणार स्वयंपूर्णतेचा ध्यास, युवा पिढीने लाभ घ्यावा

cooperative degree diploma courses in the goa soon said cm pramod sawant | राज्यात सहकार पदवी, डिप्लोमा अभ्यासक्रम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

राज्यात सहकार पदवी, डिप्लोमा अभ्यासक्रम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: राज्यात सहकार चळवळ अतिशय वेगाने पुढे यावी, यासाठी अधिक परिश्रम तसेच संघिक प्रयत्न गरजेचे आहेत. सहकारातून राज्याला स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर करण्यासाठी विशेष कृती योजना आखून त्यादृष्टीने विविध क्षेत्रांत स्वावलंबी राज्य व्हावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आगामी वर्षात सहकार पदवी तसेच डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रवींद्र भवन साखळी येथे आयोजित कार्यक्रमास सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, नगराध्यक्ष रश्मी देसाई, गुरुदत्त संझगिरी, वल्लभ साळकर, वासुदेव परब, नाबार्डचे मिलिंद बिरुड, सहकार निबंधक मॅन्युअल बार्रेटो, उल्हास फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.

पैसे गुंतवताना सावधगिरी बाळगा

सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. नवी पिढी सहकार क्षेत्रात येणे गरजेचे आहे. लोकांनी पैसे गुंतवताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काही संस्थांनी लोकांचे पैसे हडप केले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कचरा व्यवस्थापनाद्वारे व्यवसाय संधी 

कचरा व्यवस्थापन व नियोजनाच्या माध्यमातून लोकांचे पैसे वापरून उत्कर्ष साधणे, पाणीवाटप संस्थेच्या मार्फत लोकांना नफा घेणे शक्य आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

स्वावलंबी व्हावे, हाच एकमेव उद्देश

सहकारी कायदे अधिक मजबूत होणे गरजेचे आहे. तसेच डिजिटल व्यवस्था होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्र वेगळे करून या माध्यमातून देशात समृद्धी यावी, हा प्रयत्न आहे. संस्थांनी अनेक व्यवसाय करुन स्वावलंबी व्हावे हा उद्देश आहे. कृषी, दूध उत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, भाजी लागवड व इतर बाबतीत विशेष लक्ष दिले, तर प्रत्येक हाताला काम व समृद्धी येईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

सत्कार सोहळा

यावेळी सहकार क्षेत्रातील गुरुदत्त संझगिरी (अध्यक्ष, डिचोली अर्बन बँक), आर. के. पोकळे, प्रतिमा धोंड, कृष्णा कुडणेकर, शिवाजी भांगी, पांडुरंग कुकर व इतरांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिलिंद
बिरुड यांनी देश पातळीवर सहकार चळवळ व राज्याच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन गोविंद भागत यांनी केले. राज्यातून विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

सहकाराद्वारे समृद्ध गोवा घडवण्याचा संकल्प

आज दूध, भाजी यासाठी आम्हाला इतर राज्यांत जावे लागते. हजारो संस्था असूनही असे का?, असा प्रश्न आहे. संस्थांनी अधिक लक्ष देत विशेष रुची सर्वच क्षेत्रात घेतली, तर आम्ही दूध, भाजी व इतर बाबतीत स्वावलंबी होणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. सहकाराच्या माध्यमातून समृद्ध गोवा निर्माण करण्याचा संकल्प यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महिलांना सहकारक्षेत्रात संधी

मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे, युवा पिढीला पुढे आणून सहकारातून समृद्धी शक्य आहे. प्रत्येक पंचायतीत एक मल्टिपर्पज संस्था सुरु करून सर्वच क्षेत्रांत सहकार आणून समृद्धी येणे शक्य असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.


 

Web Title: cooperative degree diploma courses in the goa soon said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.