गोव्यात ‘कोरोना’ निगा केंद्रे वाढवली, एमपीटी इस्पितळही आता ‘कोविड’ स्पेशल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:01 PM2020-06-15T17:01:44+5:302020-06-15T17:01:55+5:30
सर्वप्रथम ७ जून रोजी शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्र ‘कोरोना’ निगा केंद्र जाहीर करण्यात आले
पणजी : गोव्यात ‘कोरोना’ निगा केंद्रांची संख्या वाढवून अधिकाधिक रुग्णांना तेथे सामावून घेण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिका-यांनी हेडलॅण्ड सडा येथील एमपीटीचे इस्पितळ असिम्प्टोमेटिक संसर्गितांसाठी ‘कोविड’ निगा केंद्र म्हणून अधिसूचित केले आहे. सर्वप्रथम ७ जून रोजी शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्र ‘कोरोना’ निगा केंद्र जाहीर करण्यात आले, त्यानंतर १२ जून रोजी कोलवा येथील पर्यटन विकास महामंडळाची रेसिडेन्सी १२ जूनपासून कोविड निगा केंद्र जाहीर केले. त्यानंतर शनिवारी केपे येथील सरकारी कला व विज्ञान महाविद्यालय इमारत कोविड निगा केंद्र जाहीर केले.
सरकार कोविड निगा केंद्रांची संख्या वाढवत असले तरी काही ठिकाणी या केंद्रांना स्थानिकांकडून मज्जावही केला जात आहे. प्रारंभीच शिरोडा येथे स्थानिकांनी मज्जाव केला. आता वास्कोतही एमपीटीचे इस्पितळ कोविड संसर्गितांसाठी घेतल्यास या इस्पितळावर अवलंबून असलेल्या तब्बल १५ हजार स्थानिकांनी कुठे जावे?, असा प्रश्न केला जात आहे.
रुग्ण पाचशेंच्या उंबरठ्यावर!
४१ नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४९0 झाली आहे. गेल्या २४ तासात एकूण ४ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले. मांगोरहिलमध्ये आणखी २९ तर केपेंमध्ये २ पॉझिटिव्ह आढळले. पाचशेंच्या उंबरठ्यावर असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मांगोरहिलचे रुग्ण सर्वात जास्त आहेत. तेथील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २७२ झालेली आहे तर मांगोरहिलशी संबंधित रुग्णांचा आकडा १४७ वर पोचला आहे. केपें येथे २ तर मडगांव व बेती येथे २ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. रस्ता, रेल्वे विमानाने आलेले आणि पॉझिटिव्ह आढळलेले ६७ रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण ७४ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले. ३0५ जणांचे अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.