कोरोना वाढला; डेंग्यू घटला, आतापर्यंत ३७ रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 09:36 AM2023-12-25T09:36:58+5:302023-12-25T09:37:41+5:30
आरोग्य यंत्रणा सज्ज, उपाययोजना सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी ( Marathi News ): राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, तर डेंग्यूची प्रकरणे कमी झाली आहेत. राज्यात सध्या ३७ कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या झाली आहे. देशभर सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे.
राज्यात मागील नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूची ७० प्रकरणे नोंदवली, ती आता दि. २३ डिसेंबरपर्यंत एकूण २२ प्रकरणे नोंद झाली आहे. तर दुसन्या बाजूने राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पावसाळा गेल्याने आता डेंग्यूचे रुग्ण कमी झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूने कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
राज्यात यंदा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण वाढले होते. काहीजणांचा मृत्यूही झाला होता. पण, आरोग्य यंत्रणेने याची गंभीर दखल घेतली सर्व भागांत जागरूकता केली आहे. त्यामुळे आता हळूहळू डेंग्यूच्या रुग्णांतही घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूची ९० प्रकरणे नोंद झाली होती; तर नोव्हेंबरमध्ये ७० प्रकरणे नोंद झाली. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत २२ प्रकरणे नोंद झाली आहेत.
दाट लोकवस्तीमध्ये जंतूनाशक फवारणी
आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरपर्यंत गोव्यात पडलेल्या अनियमित पावसामुळे रुग्णसंख्या वाढली होती. आता डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होत आहेत. म्हापसा, ताळगाव, वास्को, मडगाव, कुठ्ठाळी व चिंबल या भागात परप्रांतीयांची जास्त वस्ती असल्याने तेथे डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. आरोग्य खात्याने डेंग्यू प्रतिबंधात्मक नियंत्रण उपाय सुरू ठेवले आहेत. कामगारांच्या घरांना, निवासस्थानांना भेट देणे, जागृती करणे आदींसह जेथे पाणी साठले आहे, तेथे फॉगिंग करण्यात येत आहे.
पर्यटनावर परिणाम नाही : नाईक
गोव्यात कोविडचे बाधित वाढत असले, तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे. गोव्यातील पर्यटन उद्योजकांनी आणि संबंधित व्यावसायिकांनी घाबरायचे कारण नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नाईक म्हणाले की, देशाने यापूर्वी या महामारीविरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. गोव्याने खूप बिकट परिस्थितीतही या आजाराशी सामना केला आहे. कोविड प्रकरण हाताळण्यास गोव्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहेत, असे ते म्हणाले. दक्षिण गोव्यातील 'पांचजन्य' साप्ताहिकाने आयोजित केलेल्या 'सागर मंथन २.०' कार्यक्रमात ते बोलत होते.
पुन्हा लॉकडाऊन नाही, भीती अनाठायी
कोविडची प्रकरणे वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची भीती अनाठायी असल्याचेही ते म्हणाले. पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात ६५६ जणांना कोविड संसर्ग झाला आहे. त्यामुळे सक्रियबाधित ३७४२ वर पोहोचले आहेत. गोव्यात जेएएन व्हेरियंट सापडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटनावर त्याचा परिणाम होण्याची भीती पर्यटन व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री बोलत होते.