कोरोना : खबरदारी घ्या, गैरसमज धोकादायक : डॉ. उत्कर्ष बेतोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 08:25 PM2020-03-07T20:25:05+5:302020-03-07T20:27:19+5:30
कोरोना वाºयामुळे फैलावतो हे खरे आहे. परंतु चीनमधील वारा भारतात वाहून आला किंवा दिल्लीतून वारा गोव्यात वाहू लागला म्हणून त्याबरोबर कोरोना व्हायरस येणार नाही.
- वासुदेव पागी
जगाभोवती कोरोनाचा विळखा आवळताना दिसत असल्यामुळे या संसर्गजन्य रोगाशी सामना करण्यासाठी जागरूकता व खबरदारी अशा दोन गोष्टींची गरज आहे. कोरोनापेक्षा त्याविषयी असलेले गैरसमज व अपसमज अधिक आहेत, असे गोवा आरोग्य खात्याचे साथ रोग विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी ‘दै. लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रश्न : कोरोनाचा विळखा जगाला पडताना दिसतो आहे. किती धोकादायक रोग हा?
डॉ. बेतोडकर : हा रोग हवेतूनही पसरणे शक्य असल्यामुळे फैलाव होण्याच्या दृष्टीने धोकादायकच म्हणावा लागेल. हा रोग काही प्रमाणात जीवघेणाही ठरू शकतो. परंतु डेंग्यू व स्वाइन फ्लूपेक्षा या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. स्वाइन फ्लूने मृत्यू होण्याचे प्रमाण हे २०१५ च्या नोंदीनुसार भारतात ६.३ टक्के तर डेंग्यूने मृत्यू होण्याचे प्रमाण हे ४.१ टक्के एवढे होते. ज्याचा धसका जगाने घेतला आहे त्या करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे २.४ टक्के एवढे आहे.
प्रश्न: चिनी वस्तू आॅनलाइन मागविणे किती सुरक्षित?
डॉ. बेतोडकर : तशी शक्यता कमीच आहे. खरेदी केलेल्या पार्सलमधून कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आमच्या निदर्शनास आलेले नाही. तसे झालेले असेल असे गृहीत धरले तरी तशी अधिकृत माहिती नाही.
प्रश्न : कोरोना वाऱ्यामुळे फैलावतो हे कितपत सत्य?
डॉ. बेतोडकर : कोरोना वाºयामुळे फैलावतो हे खरे आहे. परंतु चीनमधील वारा भारतात वाहून आला किंवा दिल्लीतून वारा गोव्यात वाहू लागला म्हणून त्याबरोबर कोरोना व्हायरस येणार नाही. कोरोनाचा संसर्ग हा हवेतून जास्तीत जास्त दोन मीटरपर्यंत होऊ शकतो. त्यापलीकडे हा विषाणू जाऊ शकत नाही.
प्रश्न : कोरोना झालेला रुग्ण उपचारांनी किती दिवसांत बरा होतो?
डॉ. बेतोडकर : ते रुग्णाच्या शरीरातील प्रतिकार क्षमतेवर अवलंबून आहे. केरळातील रुग्ण १० दिवसांत पूर्ण बरा झाला. या रोगाची लक्षणे दिसून येताच लवकर निदान करून लवकर उपचार सुरू केल्यास अधिक चांगले. रक्ताचे नमुने मुंबईत पाठवून अहवाल येईपर्यंत दोन दिवस लागतात.
प्रश्न : तापमानाशी या व्हायरसचा काय संबंध?
डॉ. बेतोडकर : खूप काही लिखाण यासंबंधी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ते सर्वच खरे मानून चालू नये. तापमान वाढीबरोबर स्वाइन फ्लू, कोरोना यासारख्या व्हायरसचा संसर्ग कमी होतो. उन्हाळा त्या दृष्टीने दिलासादायक निश्चित असेल. परंतु संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे सर्वात चांगले.
प्रश्न : कोणती खबरदारी घ्यावी?
डॉ. बेतोडकर : जी खबरदारी आम्ही स्वाइन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी घेतो तीच खबरदारी कोरोना टाळण्यासाठीही घ्यावी. जागतिक परिस्थितीत सुधार होईपर्यंत विदेशात प्रवास करू नका. राज्याबाहेरही प्रवास शक्यतो टाळा. मेळावे, जत्रा अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. वारंवार हात कोपरापासून स्वच्छ धुणे ही सर्वाधिक प्रभावी खबरदारी. आरोग्य खात्यासह सरकारी अन्य यंत्रणांनी जी खबरदारी घ्यायला हवी आहे ती घेतली जात आहे. विदेशातून आलेल्यांची तपासणी होत आहे. खासगी इस्पितळे व हॉटेल्सच्या संपर्कात आरोग्य खाते आहे. अजूनही गोव्यात कुणीच कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही
प्रश्न : मास्क घालून फिरणे कितपत योग्य?
डॉ. बेतोडकर : मास्क हे प्रत्यक्ष कोरोना संसर्गित रुग्णावर उपचार करणाऱ्यांसाठी आहेत, इतर लोकांना वापरण्याची गरज नाही. तसेच मास्क वापरताना घेणाºया खबरदारीची माहिती नसेल तर त्याचे विपरीत परिणामही होण्याची शक्यता असते.