CoronaVirus News: गोव्यात 10 दिवसांत 2718 कोविड रुग्ण ठणठणीत; पण 49 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:40 PM2020-08-20T15:40:30+5:302020-08-20T15:43:29+5:30
CoronaVirus News: मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यानं प्रशासनाच्या चिंतेत वाढ
पणजी : राज्यात कोविडग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढतेय. अनेक शहरांना व गावांना कोविडने वेढा घातला. मात्र त्याचबरोबर गेल्या दहा दिवसांत एकूण कोविडग्रस्तांपैकी 2 हजार 718 रुग्ण आजारातून पूर्ण बरे झाल्याचे स्पष्ट होत आहे. याच दहा दिवसांत 49 कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. या 49 पैकी बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहेत व त्यांना अन्यही काही आजार होते.
दि. 10 ऑगस्ट ते दि. 19 ऑगस्ट या दहा दिवसांची आकडेवारी जर पाहिली तर, मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. पूर्वी दिवसाला केवळ एक किंवा दोघांचे बळी जायचे. मात्र अलिकडे दिवसाला कधी पाच तर कधी सहा कोविडग्रस्तांचा जीव गेल्याचे दिसून येते. 19 रोजी कहरच झाला. त्या दिवशी सर्वाधिक म्हणजे आठ कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. या आठपैकी एकाचा मृत्यू आधीच झाला होता. त्याची शवचिकित्सा केली असता, त्याला कोविड होता हे स्पष्ट झाले. गेल्या 17 रोजीही जास्त मृत्यू झाले. त्या दिवशी सात कोविडग्रस्तांचा जीव गेला असे आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 18 ऑगस्ट रोजी पाचजणांचा कोविडने बळी घेतला. 10 ऑगस्ट रोजी पाचजणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. 11 रोजी सहाजणांचा मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांत एकही दिवस असा गेला नाही की, त्यावेळी कोविडग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली नाही. दि. 13 व 14 ऑगस्ट रोजी प्रत्येकी दोघा कोविडग्रस्तांचे निधन झाले.
राज्यातील आतापर्यंत एकूण सुमारे तेरा हजार कोविडग्रस्तांपैकी 9 हजार कोविडग्रस्त आजारातून बरे झाले ही दिलासादायक गोष्ट आहे. गेल्या दहा दिवसांत यापैकी 2 हजार 718 व्यक्ती कोडिवच्या आजारातून ब:या झाल्या. 10 ऑगस्ट रोजी 213 तर 11 रोजी 272 व्यक्ती कोविडच्या आजारातून ठीक झाल्या. 19 ऑगस्ट रोजी 357 तर 18 ऑगस्ट रोजी 298 कोविडग्रस्तांचा आजार बरा झाला. राज्यात आतार्पयत एकूण 124 व्यक्तींचा कोविडमुळे बळी गेला, त्यापैकी 49 कोविडग्रस्तांचे मृत्यू हे केवळ दहा दिवसांत झाले आहेत. म्हणजे रोज सरासरी पाच व्यक्तींचा जीव गेल्या दहा दिवसांत गेल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या दहा दिवसांतच राज्यातील काही अतिमहनीय व्यक्तींना कोविडची लागण झाल्याचे दिसून येते. केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक, आमदार नीळकंठ हळर्णकर, सुदिन ढवळीकर, चर्चिल आलेमाव तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना गेल्या दहा दिवसांत कोविडची लागण झाली. राज्यातील खासगी इस्पितळांमध्ये वीस टक्के खाटा कोविडग्रस्तांसाठी ठेवण्यात आल्याचा दावा सरकार करते तरी प्रत्यक्षात तीन इस्पितळांनी फक्त तीन-चार एवढय़ाच खाटा स्वत:च्या इस्पितळात कोविडग्रस्तांसाठी ठेवल्या असल्याची माहिती मिळते. एका आमदाराला खासगी इस्पितळात ठेवण्यासाठी खाटच उपलब्ध होत नव्हती, त्यावेळी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला व मग खाट उपलब्ध केली गेली. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात किंवा मडगावच्या कोविड इस्पितळात जाणा:या रुग्णांची संख्या वाढली आहे.