Coronavirus News: गोव्यात कोरोनाचे 30 नवे रुग्ण, एकूण संख्या 263 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 08:45 PM2020-06-08T20:45:45+5:302020-06-08T20:47:05+5:30
मांगोरहीलला नवे 28 कोरोना रुग्ण आढळले
पणजी : राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी 263 झाली. मांगोरहीलला नवे 28 कोरोना रुग्ण आढळले. राज्यभरात मिळून नवे 30 रुग्ण आढळले. मांगोरहीलचे रुग्ण हे 20 ते 40 वर्षे वयोगटातील आहेत.
आरोग्य सचिव श्रीमती निला मोहनन यांनी येथे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. मांगोरहीलला एकूण कोरोना रुग्ण संख्या 230 झाली आहे. शिरोडा येथील कोविद काळजी केंद्रात तेरा रुग्ण ठेवले गेले आहेत. केंद्र सुरू करून दोनच दिवस झाले आहेत. कोरोनाची लक्षणो दिसत नसलेले हे तेरा रुग्ण आहेत पण ते पॉझिटिव्ह आहेत, असे श्रीमती मोहनन यांनी स्पष्ट केले. सोमवारी गुजरातून रेल्वेने गोव्यात आलेला एकटा कोविड पॉझिटिव्ह आढळला. तसेच महाराष्ट्रातूनही रस्तामार्गे आलेला एकटा कोरोनाग्रस्त आढळला. उर्वरित 28 रुग्ण हे मांगोरहीलशीसंबंधित आहेत, असे मोहनन यांनी सांगितले.
तेरा आरोग्य कर्मचाऱ्यांना लागण
मांगोरहीलला यापूर्वी काम केलेले आरोग्य सेवा संचालनालयाचे तेरा कर्मचारी पॉङिाटीव आढळून आले आहेत. अगोदर आठ कर्मचारी करोनाग्रस्त आढळून आले होते. सोमवारी त्यात आणखी पाचजणांची भर पडली. सत्तरी, सांगेत काही कर्मचाऱ्यांची घरे आहेत. एका कर्मचाऱ्याचे कुटुंबही पॉझिटिव्ह आढळून आले. सर्वावर उपचार सुरू आहेत. श्रीमती मोहनन म्हणाल्या, की मांगोरहीलला ज्येष्ठ नागरिक तसेच व्याधी असलेले नागरिक, गरोदर महिला यांची आम्ही काळजी घेतो, त्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आम्ही जपतो. मात्र आतापर्यंत मांगोरहीलशीसंबंधित जे रुग्ण आढळले ते सगळे वीस ते चाळीस वर्षे वयोगटातील आहेत.
2 रुग्ण ठीक
सोमवारी कोरोना आजारातून उपचारानंतर दोन रुग्ण बरे झाले. त्यांना कोविद इस्पितळातून डिस्चार्ज दिला गेला. एकूण 1 हजार 716 व्यक्तींच्या कोविद चाचण्या केल्या गेल्या. 2 हजार 56 चाचण्यांचे अहवाल आले. एकूण 961 चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. पाच रुग्ण इस्पितळाच्या आयसोलेशन विभागात आहेत. मांगोरहीलच्या ओपीडीमध्ये सोमवारी काहीजणांच्या कोविद चाचण्यांसाठी नमुने घेतले गेले.
20 हजार लोक गोव्यात दाखल
गेल्या दि. 29 एप्रिलपासून आतापर्यंत एकूण 20 हजार 98 व्यक्तींनी गोव्यात प्रवेश केला. एकूण 1 लाख 9 हजार 40 व्यक्तींनी गोवा सोडला. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत 9 हजार 63 व्यक्तींना आतापर्यंत दंड ठोठावला गेला आहे. तसेच मास्क न घातल्याबाबत 23 हजार 440 व्यक्तींविरुद्ध कारवाई झाली आहे, असे महसूल सचिव संजयकुमार यांनी सांगितले.