Coronavirus: गोव्यात ऑक्टोबरमध्ये 6,700 नवे कोविडबाधित; बहुतांश रुग्ण पन्नाशी ओलंडलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 02:21 PM2020-10-19T14:21:33+5:302020-10-19T14:21:44+5:30
Goa Coronavirus News: ऑक्टोबरमध्येही चाचण्यांचे प्रमाण वाढलेले नाही. सप्टेंबर महिन्यातही कोविड चाचण्यांची संख्या कमीच होती पण नवे कोविड बाधित त्यावेळी जास्त आढळले होते.
पणजी : सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात नवे कोविडबाधित संख्येने कमी आढळले आहेत. तरी देखील दि. 1 ते दि. 18 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 6 हजार 700 नव्या कोविड रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे.
ऑक्टोबरमध्येही चाचण्यांचे प्रमाण वाढलेले नाही. सप्टेंबर महिन्यातही कोविड चाचण्यांची संख्या कमीच होती पण नवे कोविड बाधित त्यावेळी जास्त आढळले होते. आता ऑक्टोबरमध्ये चाचण्याही कमी व नवे रुग्णही कमी अशी स्थिती हळूहळू येऊ लागली आहे. अठरा दिवसांची आकडेवारी तरी तसेच दाखवून देते. दि. 18 ऑक्टोबरला तीन महिन्यांतील सर्वात कमी कोविड रुग्णांची नोंद झाली. त्या दिवशी फक्त 187 नवे बाधित आढळले. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी 309 कोविडबाधित आढळले होते. 16 रोजी 321 तर 15 रोजी 332 आणि 14 रोजी 356 कोविडबाधित आढळले. 2 ऑक्टोबर रोजी 513 तर 4 ऑक्टोबर रोजी 428 नवे कोविड बाधित आढळले होते.
ऑक्टोबर महिन्यातील उर्वरित दिवसांत आणखी कमी कोविड रुग्ण जर आढळले तर गोव्यात कोविड खूप नियंत्रणात येऊ लागल्याचे म्हणता येईल असे खासगी क्षेत्रतील डॉक्टरांचे म्हणणो आहे. पणजी, मडगाव, साखळी, डिचोली, फोंडा आदी ठिकाणी आता कोविडग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रत दिवसाला फक्त तीन ते चार नवे बाधित आढळत आहेत. पूर्वी तिथे पंधरा ते वीस आढळत होते. दरम्यान, राज्यात कोरोनामुळे मरण पावणा:या रुग्णांची संख्या मात्र अजून कमी होण्याची गरज व्यक्त होत आहे.रोज पाच ते सहा रुग्ण कोविडमुळे मरण पावत आहेत. आतार्पयत साडेपाचशे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. यात सर्व वयोगटातील रुग्ण आहेत पण बहुतांश रुग्ण हे पन्नासहून जास्त वर्षाचे आहेत.