CoronaVirus News: गोव्यात ९० टक्के रेस्टॉरण्टस्, हॉटेल्स बंदच!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 08:26 PM2020-06-08T20:26:36+5:302020-06-08T20:29:56+5:30
मॉल उघडले, मात्र ग्राहकांची तुरळक उपस्थिती
पणजी : गोव्यात रेस्टॉरण्टस, चहा-फराळाची हॉटेल्स कामगारांअभावी उघडू शकलेली नाहीत. ओडिशा, पश्चिम बंगाल तसेच शेजारी राज्यांमधील कामगार लॉकडाऊनच्या काळात आपापल्या गांवी परतल्याने ९0 टक्के रेस्टॉरण्टस्, हॉटेल्सना कामगारांची समस्या निर्माण झालेली आहे. दुसरीकडे मॉल सुरु झाले असले तरी ग्राहकांची अगदीच तुरळक उपस्थिती दिसत आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये रोज कामाला येणारे कर्मचारी तसेच कामा-धंद्यानिमित्त बाहेर फिरणाºयांना रेस्टॉरण्टस् बंद असल्याने दुपारी तसेच रात्रीच्या जेवणाची आबाळ होत होती. सर्वांनाच घरुन जेवणाचे डबे आणणे शक्य होत नाही. अनेक कर्मचारी, अधिकारी असे आहेत की ते डबे न घेताच येतात. सरकारी कार्यालयांची कॅन्टीनेही बंद आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही चहा, नाश्ता किंवा जेवणाच्या बाबतीत परवड होत होती. ’आजपासून हॉटेल्स, रेस्टॉरण्टस् सुरु झाल्यानंतर ही अडचण दूर होईल, असे कर्मचाऱ्यांना वाटले होते. परंतु कामगारांअभावी हॉटेल्स, रेस्टॉरण्टस् उघडू न शकल्याने ही समस्या कायम असल्याचे दिसून येते.
‘कॅफे भोसले’चे मालक मिलिंद भोसले म्हणाले की, ‘कामगारांअभावी हॉटेल व्यावसायिक हॉटेले सुरु करु शकलेले नाहीत. लॉकडाऊनच्या काळात हॉटेले बंद राहिल्याने वेटर तसेच अन्य कामगार आपापल्या गांवी गेले. अगदीच कमी कामगार घेऊन हॉटेले चालविणे अशक्य आहे त्यामुळे आम्ही हॉटेल खुले केलेले नसून पार्सल सेवाच सुरु ठेवलेली आहे.’ भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांमधील तीसेक कामगार होते. यातील अनेकजण आपापल्या गांवी परतल्याने केवळ ६ जण राहिले आहेत.
‘कॅफे आराम’चे व्यवस्थापक समीर केसरकर म्हणाले की, ‘ आमच्याकडे वेटर, आचारी, कपबशा धुणारे तसेच अन्य मिळून २२ कामगार होते. निम्म्याहून अधिक कामगार गावी परतले त्यामुळे हॉटेल सुरु करण्यास अडचण येत आहे. शिवाय आता मार्गदर्शक तत्त्वेंही इतकी कडक आहेत की त्याचे पालन करताना सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. तूर्त तरी आम्ही पार्सल सेवाच सुरु ठेवणार आहोत. २६ एप्रिलपासून आम्ही ‘टेक अवे’ अर्थात पार्सल सेवा सुरु केलेली आहे.’
मॉल्समध्ये तुरळक उपस्थिती!
मॉल उघडले असले तरी सकाळच्या सत्रात ग्राहकांची अगदीच तुरळक उपस्थिती होती. मॉलमधील सिनेमागृहे तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले करमणुकीचे विभाग बंद आहेत. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा सांतइनेज येथील काकुलो मॉलचे मालक मनोज काकुलो म्हणाले की, ‘सकाळीच मॉल उघडला आणि मॉलमधील सर्व स्टोअर्सही खुले झाले. तयार कपडे तसेच अन्य स्टोअर्स या मॉलमध्ये आहेत. स्टोअरच्या आकाराप्रमाणे मोजक्या ग्राहकांनाच आत सोडले जाते. शारीरिक अंतर तसेच मार्गदर्शक तत्त्वांमधील अन्य तरतुदींचे आम्ही काटेकोर पालन करीत आहोत.’ हॉटेल्स, रेस्टॉरण्टसना कामगार गावी गेल्याने कामगारांची समस्या निर्माण झालेली आहे. मॉलांच्या बाबतीत काय स्थिती आहे, असा प्रश्न केला असता काकुलो म्हणाले की, ‘आमचे सर्व कामगार कामावर रुजू झालेले आहेत कारण लॉकडाऊनच्या काळात त्यांना आम्ही वेळच्यावेळी पूर्ण वेतन दिले. आमच्याकडून कोणीही कामगार गेलेला नाही.’
सकाळच्या सत्रात मॉलमधील तुरळक उपस्थितीबाबत काकुलो यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘एरव्हीदेखिल दुपारनंतरच दुसºया सत्रात ग्राहकांची उपस्थिती असते. एक दोन दिवसांनंतर चित्र स्पष्ट होईल. परंतु ग्राहक मॉलमध्ये येतील हे निश्चित.’
रेस्टॉरंट्स उघडता, मग बार का नको?; आम आदमी पक्षाचा सवाल
हॉटेले, रेस्टॉरण्टस उघडण्यास परवानगी दिली, मग बारच का नको?, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर यांनी केला आहे. ते म्हणतात की, लॉकडाऊनमुळे गेले अडीच महिने बार आणि तावेर्न बंद राहिली. त्यामुळे व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. बार व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झालेले आहे. सरकारने घाऊक मद्य विक्रेत्यांना वेळेचे बंधन घालून सूट दिली. आता हॉटेले, रेस्टॉरण्टस्ही खुली केली तर मग बार व्यावसायिकांच्या बाबतीतच पक्षपात का? असा सवाल पाडगांवकर यांनी केला.