'कर्णिका जहाजावर अडकलेल्या 93 गोवेकरांना गोव्यात आणा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 07:00 PM2020-04-13T19:00:08+5:302020-04-13T19:00:23+5:30
अडकलेल्या खलाशांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : खास बसेस पाठविण्याची मागणी
मडगाव: मुंबई बंदरावर अडकलेल्या कर्णिका या जहाजावर असलेल्या 93 गोवेकर खलाशाना गोव्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करणारे सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना पाठविले आहे.
दरम्यान , कोची बंदरात असलेले मारावेला हे जहाजही मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून या जहाजावर 65 गोवेकर अडकले आहेत, हे जहाज गोव्यातून मुंबईला जाणार असल्याने ते गोव्यातच थांबवून गोवेकारांना गोव्यातच उतरविता येणे शक्य आहे का याचा सरकारने विचार करावा अशी मागणी गोवा सीमेन अससोसिएशनने केली आहे.
सध्या मुंबईत असलेल्या कर्णिका या जहाजावर एकूण 490 खलाशी असून त्यापैकी 93 गोवेकर आहेत. 1 मार्च रोजी 124 प्रवाशांना घेऊन हे जहाज दुबईला जाण्यासाठी मुंबईहून बाहेर पडले होते. 5 रोजी ते दुबईला पोहोचले त्यानंतर कुठल्याही प्रवाशांना न घेता ते परत मुंबईत 12 मार्च रोजी परतले. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खलाशाना 14 दिवस क्वारान्टीन करून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा विलगीकरणाचा कालावधी 26 मार्चला संपणार होता पण 24 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने सगळे खलाशी आतच अडकले.
या खलाशानी मुख्यमंत्री सावंत यांना लिहिलेल्या पत्रात या जहाजावर असलेल्या मुंबईतील खलाशाना घरी जाऊ दिले. ब्रिटिश व अमेरिकन खलाशाना त्या त्या देशातील अधिकारी घेऊन गेले. आत अडकलेल्या गोव्याच्या खलाशाना बाहेर काढण्यासाठी सरकारने खास बसी पाठवाव्या अशी मागणी केली आहे .
दरम्यान दुबईच्या किनाऱ्यावरही दोन जहाजे अडकून पडली असून त्यातही गोवेकर खलाशी अडकले आहेत. मागचा महिनाभर आम्ही तणावाखाली वावरत असल्याची माहिती नोटीकन ओशियानिया या बोटीवर अडकलेला केपेतील खलाशी विजय देवर यांने सांगितले. या बोटीवरही 43 गोवेकर अडकले आहेत.