CoronaVirus : गोव्यातील कोरोना रुग्णालयात अजून 115 खाटा रिकाम्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:16 PM2020-07-08T13:16:41+5:302020-07-08T13:17:11+5:30
CoronaVirus : मडगावचे इस्पितळ पूर्ण भरलेले आहे हे मंत्री राणे यांचे विधान सरकारमधील अनेक मंत्री व भाजपलाही रुचले नाही.
पणजी : मडगावच्या कोविड इस्पितळातील सर्व खाटा अजून भरलेल्या नाहीत. कोविड इस्पितळातील एकूण 220 खाटांपैकी फक्त 105 खाटांवर रुग्ण आहेत. अजून तिथे 115 खाटा रिकाम्या आहेत, अशी माहिती आरोग्य खात्यानेच बुधवारी दिली. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मडगावच्या कोविड इस्पितळातील सगळ्या खाटा भरलेल्या आहेत, असे विधान मंगळवारी केले होते. पेडणे येथे आरोग्यमंत्री राणे यांनी एक बैठक घेतली होती.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे या बैठकीस उपस्थित होते. त्यानंतर राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मडगावच्या कोविड इस्पितळातील सगळ्य़ा खाटा भरल्या व आता यापुढे उत्तर गोव्यात एखादे नवे कोविड इस्पितळ सुरू करावे लागेल, असे विधान केले होते. मात्र मंत्री राणे यांना अतिउत्साह नडला. त्यांनी बुधवारीच आपले विधान दुरुस्त केले. त्यांनी नवे विधान केले व कोविड इस्पितळातील 220 पैकी फक्त 105 खाटा व्यापलेल्या आहेत, असे स्पष्ट केले आहे. मडगावचे इस्पितळ पूर्ण भरलेले आहे हे मंत्री राणे यांचे विधान सरकारमधील अनेक मंत्री व भाजपलाही रुचले नाही.
दरम्यान, आयसीएमआरने कोविडविरोधात जी नवी काही औषधे स्पष्ट केली आहेत, त्यात फॅबिफ्लू, रेमडिसीवीर व टॉक्सिलीझूमॅब यांचा समावश होतो. ही औषधे खरेदी करण्यासाठी आरोग्य खात्याने प्रक्रिया सुरू केली आहे. रेमडिसीवीर औषधाचा पहिला साठा विमानाने हैदराबादमधून आज बुधवारी सायंकाळपर्यंत गोव्यात दाखल होत आहे, अशी माहितीही मंत्री राणे यांनी दिली. राज्यात सध्या 739 सक्रिय कोविड रुग्ण आहेत. रोज सरासरी 90 नवे कोविडग्रस्त आढळतात. चाळीसपेक्षा जास्त गावांमध्ये कोविडग्रस्त व्यक्ती आतापर्यंत आढळल्या आहेत. यामुळे गोव्याला जास्त काळजी घ्यावी लागते. कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.